भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वत:ला कोडे मारून घेतले, अनवाणी चालण्याची शपथही घेतली; का केलं असं? वाचा सविस्तर…

चेन्नईतील अन्ना विद्यापीठात एका विद्यार्थिनीसोबत झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून तामिळनाडूतील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी पक्षाला घेरले असून प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी डीएमके सरकारवर हल्ला चढवला आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक भीष्मप्रतिज्ञा केली. तसेच पोलीस आणि सरकारच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून स्वत:ला कोडे मारून घेण्याचीही घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी स्वत:च्याच घरासमोर धरणे आंदोलन करत 6 वेळा कोडे मारून घेतले. याचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

अन्ना विद्यापीठात झालेल्या कथित बलात्काराच्या घटनेमुळे चेन्नईत खळबळ उडाली आहे. विद्यापीठात इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. याची तक्रार स्वत: विद्यार्थिनीने पोलिसात केली होती. मात्र सुरुवातीला पोलिसांनी थातूरमातूर कारणे देत कारवाई करण्याचे टाळले. मात्र विरोधी पक्ष आणि नेटकऱ्यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पोलिसांनी विद्यापाठीजवळ बिर्याणी विकणाऱ्या एका 37 वर्षीय आरोपीला अटक केली.

सदर आरोपीचे नाव ज्ञानशेखरन असून त्याने अनेक गुन्हे केले आहेत. मात्र पोलिसांच्या रजिस्टरमध्ये त्याची साधी नोंदही नाही. डीएमके नेत्यांशी जवळीक असल्यानेच पोलिसांनी त्याला अभय दिल्याचा आरोप अन्नामलाई यांनी केला. डीएमके नेत्यांसोबतचे त्याचे फोटोही अन्नामलाई यांनी दाखवले.

अन्नामलाई यांच्या प्रतिज्ञा

पोलीस व सरकारच्या या भोंगळ कारभाराचा निषेध म्हणून अन्नामलाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत एकामागोमाग एक घोषणा केल्या. 27 डिसेंबर रोजी घरासमोर धरणे आंदोलन करून स्वत:ला 6 कोडे मारून घेईल. उद्यापासून 48 दिवस उपवास करेल आणि सहा भुजा असणाऱ्या भगवान मुरुगन यांची आराधणा करेल. जोपर्यंत डीएमके सरकारला सत्तेतून पायउतार करत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही आणि अनवाणी चालेल, अशा भीष्मप्रतिज्ञा अन्नामलाई यांनी केल्या.

स्वत:ला कोडे मारून घेतले

शुक्रवारी अन्नामलाई यांनी घरासमोर धरणे आंदोलन करत कोडे मारून घेतले. तामिळ संस्कृतीची जाण असणाऱ्या प्रत्येकाला ही प्रथा माहिती असणार आहे. स्वत:ला कोडे मारणे, स्वत:ला शिक्षा करणे, अत्यंत कठीण अनुष्ठान करून स्वत:ला वेठीस धरणे हा या संस्कृतीचा भाग आहे, असे अन्नामलाई यावेळी म्हणाले.