माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मनमोहन सिंग यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या आपल्या काही आठवणीही शरद पवार यांनी यावेळी सांगितल्या.
मनमोहन सिंग हे आज आपल्यामध्ये नाहीत, यामुळे अस्वस्थता आहे. मनमोहन सिंग खरं म्हणजे त्यांचा पिंड हा राजकारणी नव्हता. एका दृष्टीने उत्तम अर्थ तज्ज्ञ होते. विचारवंत होते. आणि सतत उद्याचं देशाचं भवितव्य हे घडण्यासाठी काही करण्याची अवश्यकता आहे, याचा विचार करण्याची भूमिका घेत होते, असे शरद पवार म्हणाले.
माझा त्यांचा परिचय हा मुंबईचा होता. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि त्या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून ते मुंबईत काम करत होते. त्यामुळे साहजिकच कधी ना कधी कुठल्या निमित्ताने त्यांच्याशी सुसंवाद व्हायचा. यातून एक प्रकारचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण माझ्या मनात निर्माण झालं. नंतरच्या काळात चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान झाले. चंद्रशेखर यांनी आपल्या काही सल्लागारांमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून मनमोहन सिंग यांचाही सहभाग केला होता. त्यानंतर नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. आणि माझ्याकडे संरक्षण खातं होतं. विशेषतः पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या समित्या असायच्या. राजकीय, परराष्ट्र समिती यामध्ये तेही होते आणि मीही होतो. त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांवर त्यांची स्वच्छ, निर्भीड मतं ऐकायची संधी आम्हाला मिळायची. ते मितभाषी होते पण आपल्या भूमिकेवर पक्के होते, असे शरद पवार यांनी सांगितले.
पंतप्रधानपदाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यानंतर त्या 10 वर्षांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. इतका संकटाचा तो काळ होता की देशाची आर्थिक अवस्था ही अतिशय अस्वस्थ करणारी होती. ती सावरायची प्रक्रिया ही नरसिंह राव यांच्या काळात त्यांनी सुरू केली आणि स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर भरीव अशा प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी देशाला संकटाबाहेर काढलं. त्यांच्या या दहा वर्षांच्या कालखंडात अनेक मोठे निर्णय झाले. माहिती अधिकार कायदा, रोजगार हमी योजनेसारखा निर्णय असेल, असे 9-10 महत्त्वाचे निर्णय त्यांच्या काळात त्यांनी घेतले. देशाला एका वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची प्रतिष्ठा मोठी होती. आणि अशा एका कर्तृत्ववान स्वच्छ, चारित्र्य संपन्न भारतमातेच्या सुपुत्राला आज देश मुकलेला आहे. एक जुना सहकारी म्हणून आणि माझ्या पक्षाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना हा दुःखाचा धक्का सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशा प्रकारच्या आपेक्षा करतो असे म्हणत शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.