ब्रिटिशांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांची मनं खोट्या गोष्टीनं भरली, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी केलं. ते पुढे म्हणाले की, ‘इंग्रजांनी त्यांच्या बळाच्या जोरावर आणि आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेत खोट्या गोष्टी रुजवल्या’.
‘ब्रिटिशांनी सत्य झाकून टाकलं आणि आपल्या देशातील लोकांच्या मनात अनेक खोट्या गोष्टी रुजवल्या. त्यापैकी एक म्हणजे आज हिंदुस्थानात दिसणारे बहुतेक लोक बाहेरून आलेले आहेत. त्या वेळी द्रविडांनी त्यांना हाकलून लावलं होतं. मग आर्य आले ज्यांनी द्रविडांना आणखी मागे ढकललं. ते म्हणतात की आपल्या देशाचा इतिहास असा आहे की कोणीतरी बाहेरून आले आणि इथल्या लोकांना पराभूत करून स्वतः राजा बनले. या देशाच्या लोकांना राज्य करताच येत नाही आणि इथे धर्मशाळेत राहायला आलेल्या लोकांसारखे लोक राहतात अशी विचारधारा त्यांनी पक्की केली आहे. त्यांच्या बळाच्या जोरावर आणि आपल्या अज्ञानामुळे हा सिद्धांत त्यांनी आपल्या मनात रुजवला आहे. अर्थात यावर कोणीही विश्वास ठेवत नाही याबद्दल बरेच पुरावे आहेत. परंतु तरीही आपल्या लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागत आहे’, असं सरसंघचालक म्हणाले.
याआधी सोमवारी, महानुभाव आश्रम शतकपूर्ती समरोहला संबोधित करताना, सरसंघचालक भागवत यांनी विविध पंथांना काम करण्याचे आणि त्यांच्या अनुयायांना त्यांचा धर्म समजावून सांगण्याचे आवाहन केले. कारण धर्माच्या गैरसमजामुळे जगात अत्याचार होतात अशी भूमिका त्यांनी मांडली.
धर्माच्या गैरसमजामुळे जगात अत्याचार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. धर्माचा योग्य अर्थ लावणारा समाज असणे आवश्यक आहे. धर्म हा खूप महत्त्वाचा आहे, तो नीट शिकवला पाहिजे. धर्म समजून घ्यावा लागतो, तो नीट समजला नाही तर धर्माचे अर्धे ज्ञान ‘अधर्म’कडे नेईल, असं ते म्हणाले होते.