अर्बन नक्षलवाद मोडून काढायच्या आधी बीडचा दहशतवाद मोडून काढा, संजय राऊत यांचे फडणवीसांना आव्हान

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता पोलीस स्टेशनच्या आवारातच एका समाजिक कार्यकर्त्याची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

”या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. बीडमधघ्ये पोलीस स्टेशनच्या आवारात कोयत्याने सपासप वार करून एका सामाजिक कार्यकर्त्याची हत्या झालीय. बीडचा बिहार झालाय. तिथे कुणाचंही लक्ष नाही. बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडलंय. काय करतायत देवेंद्र फडणवीसजी. अर्बन नक्षलवाद मोडून काढायच्या आधी बीडचा दहशतवाद मोडून काढावा. गुन्हेगार वाचवला जातोय तर ते शिंतोड़े राज्याच्या गृहमंत्र्यावर उडतायत. कुणालाही सोडणार नाही, कितीही मोठा असू द्या, असं सांगत गृहमंत्री नाकाने कांदे सोलतायत. पण मुळात तो गुन्हेगार तुमच्या खिशात आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

धनंजय मुंडे यांनी कुणीही जवळचा असला तरी फासावर लटकवा असे म्हटले आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी त्यांना या प्रकरणी सहकार्य करा व सत्तेत राहू नका, असे म्हंटले आहे. ” तुमचा जवळचा असेल कोणी असेल त्याला फाशीच्या तख्तापर्यंत पोहचविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. आपण सत्तेत आहात तोपर्यंत ते शक्य नाही. एकही मुंडे सत्तेत असता कामा नये ही भूमिका स्वत: धनंजय मुंडे यांनी घेतली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.