ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे रायगड जिल्ह्यातील 6 हजार 730 हेक्टर क्षेत्राच्या भातशेतीची अक्षरशः माती झाली. त्यापैकी 8.37 हेक्टर क्षेत्रात पेरलेल्या नाचणी पिकाचीही वाट लागली. 9 कोटी 37 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला खरा पण तब्बल तीन महिने हा प्रस्ताव अजूनही धूळखात पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 22 हजार 286 शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले असून ‘वाह रे बळीराजाचे सरकार’, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने यंदा भात पीक तसेच नाचणी पीक चांगले आले होते. मात्र पीक तयार होऊन ते कापणीलायक झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. 13 तालुक्यांमधील 22 हजार 286 शेतकऱ्यांच्या 6 हजार 738.37 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे.
मंजुरी मिळणार तरी केव्हा?
अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तालुका कृषी व महसूल विभागाकडून करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी 9 कोटी 36 लाख रुपयांची आवश्यकता असून निधी मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असलेल्या सरकारला नुकसानभरपाईचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने रायगडातील शेतकरी संतप्त झाले आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.