देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री 10 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. मनमोहन सिंग 2004 मध्ये देशाचे 14 वे पंतप्रधान बनले आणि 2014 पर्यंत असे सलग 10 वर्ष या पदावर कार्यरत राहिले. ते देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
काँग्रेसचा ‘असरदार सरदार’ अशी डॉ. मनमोहन यांची ओळख होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने आर्थिक सुधारणांचा शिल्पकार हरपला, अशी भावना देशभरातून व्यक्त होत असून त्यांच्या साधेपणाचे किस्सेही ऐकायला मिळत आहेत. असाच एक किस्सा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधानपदावर असताना त्यांचा अंगरक्षक राहिलेले माजी आयपीएस अधिकारी व उत्तर प्रदेशचे समाजकल्याण मंत्री असीम अरुण यांनी एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे.
असीम अरुण म्हणतात, ‘2004 पासून जवळपास पुढील तीन वर्ष मी त्यांचा अंगरक्षक होतो. पंतप्रधानांना एसपीजी कमांडोंचे सुरक्षा कवच असते आणि त्यातील क्लोज प्रोटेक्शन टीमला लीड करण्याची संधी मला मिळाली होती. एआयजी सीपीटी ही अशी व्यक्ती असते जी कायम पंतप्रधानांसोबत असते. पंतप्रधानांसोबत एकच अंगरक्षक राहू शकत असेल तर एआयजी जीपीटी त्यांच्यासोबत राहतो. अशा परिस्थितीमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहण्याची जबाबदारी माझ्यावर होती.’
‘डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे मारुती 800 ही कार होती. पंतप्रधान निवासामध्ये चमचमत्या बीएमडब्ल्यू कारमागे ती उभे होती. डॉ. मनमोहन सिंग मला वारंवार सांगायचे की, असीम मला या गाडीतून (बीएमडब्ल्यू) प्रवास करायला आवडत नाही. माझी गाडी मारुती 800 आहे. त्यावर मी त्यांना समजावून सांगायचो की, सर ही गाडी तुमच्या लक्झरीसाठी नाही. यात सुरक्षेसाठी खास फिचर्स असल्याने एसपीजीने ही गाडी घेतली आहे’, असे असीम अरुण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
ते पुढे म्हणतात, ‘पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जेव्हा कधी मारुती समोरून जायचा तेव्हा डॉ. मनमोहन सिंग तिच्याकडे मन भरून पहायचे. मी मध्यमवर्गीय माणूस असून सामान्य माणसाची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. करोडोंची कार पंतप्रधानांची असून माझी कार मारुती 800 आहे, या संकल्पाचा पुनरुच्चार ते वारंवार करायचे.’
मैं 2004 से लगभग तीन साल उनका बॉडी गार्ड रहा। एसपीजी में पीएम की सुरक्षा का सबसे अंदरुनी घेरा होता है – क्लोज़ प्रोटेक्शन टीम जिसका नेतृत्व करने का अवसर मुझे मिला था। एआईजी सीपीटी वो व्यक्ति है जो पीएम से कभी भी दूर नहीं रह सकता। यदि एक ही बॉडी गार्ड रह सकता है तो साथ यह बंदा… pic.twitter.com/468MO2Flxe
— Asim Arun (@asim_arun) December 26, 2024
डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तशीरपणाचा आणि साधेपणाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. भेटीच्या वेळा ते कटाक्षाने पाळत आणि कर्मचाऱ्यांसाठीही त्यांनी काही मानकं निश्चित केली होती. त्यांच्यातील नम्रतेमुळे सारेच प्रभावित व्हायचे. परदेशी पाहुणे असो किंवा घरातील कर्मचारी, ते प्रत्येकाशी सौजन्याने वागायचे, असेही असीम अरुण यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘शी बोलताना सांगितले.