गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात ‘नीलकमल’ बोट उलटून 15 जणांचा बळी गेला. ही घटना घडल्यानंतरही ठाणेकर ‘हम नही सुधरेंगे’ असे म्हणत आहेत. लाईफ जॅकेट न घालताच प्रसिद्ध मासुंदा तलावामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण रामभरोसे बोट सफर करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यांना ना कोणते भय, ना कसली खंत… मासुंदा तलावात बिनधास्त स्टंटबाजी केली जात असून ‘नीलकमल’सारखी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
‘नीलकमल’ची दुर्घटना घडल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी स्वतः मासुंदा तलावाला भेट दिली. तसेच प्रत्येक नागरिकाने लाईफ जॅकेट घालूनच बोटिंग करावे, अशी सक्त ताकीदही दिली होती. तरीदेखील शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी बिनधास्तपणे ठाणेकर व बाहेरून आलेले पर्यटक मासुंदा तलावात बोटिंग करताना दिसतात. सध्या ख्रिसमसची सुट्टी असल्याने मासुंदा तलावाभोवती बच्चे कंपनींची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र कोणीही सुरक्षा लक्षात घेऊन लाईफ जॅकेट घालत नसल्याबद्दल मासुंदा तलावातील बोटचालक नरेंद्र पलाये यांनी नाराजी व्यक्त केली.
पॅडल व मशीन बोट
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 35 तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबेघोसाळे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मासुंदा तलाव येथे 35 पॅडल बोट व 2 मशीन बोट, उपवन तलाव येथे 16 पॅडल बोट व 1 मशीन बोट तर आंबेघोसाळे तलाव येथे 4 पॅडल बोट व 1 मशीन बोट उपलब्ध आहे.
- ठाणे शहरातील बोटिंगसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. येथे येणाऱया नागरिकांना तसेच पर्यटकांना लाईफ जॅकेट घालूनच बोटींमध्ये बसवण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तरीदेखील त्याचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे.
- बोटिंगसंदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, अशा स्पष्ट सूचना ठेकेदारांना दिल्या असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.
‘नीलकमल’च्या दुर्घटनेनंतर आली जाग गायमुख खाडी
ठाणे शहरातील गायमुख खाडी ही अतिशय महत्त्वाची समजली जाते. या भागात पालिकेने चौपाटी विकसित केली असून मोठय़ा संख्येने नागरिक तसेच तरुण व तरुणी गायमुखला येतात. ‘नीलकमल’ बोट उलटल्याची घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून बोटीमध्ये बसण्यापूर्वी लाईफ जॅकेट घालणे येथे सक्तीचे केले आहे.
टिटवाळा तलाव
टिटवाळय़ातील गणपती मंदिराच्या समोर असलेल्या तलावातदेखील आता बोटिंग करणाऱयांना लाईफ जॅकेट सक्तीचे करण्यात आले आहे. ‘नीलकमल’ची घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी मनमानीपणे कशाही प्रकारे बोटिंग केले जायचे. आता प्रशासन ताळय़ावर आले असून लाईफ जॅकेट घालूनच प्रवेश दिला जात आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अलर्ट
यंदाचा शेवटचा शनिवार, रविवार व थर्टी फर्स्ट लागून आल्याने पर्यटक, बच्चे कंपनीची गर्दी लक्षात ठेऊन पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. थर्टी फर्स्टची धूम पहाटेपर्यंत चालणार असल्याने बोटिंग, पाळणे, घोडागाडी, खाऊच्या गाडय़ा व नागरिकांच्या प्रत्येक हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचा वॉच राहणार आहे. मुंबईपासून तास-दोन तासांच्या अंतरावर असलेल्या सगळय़ाच पर्यटनस्थळांवर आणि किनाऱयांवर अलर्टच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.