विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणार देश-विदेशातून अनुयायी

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. यंदाच्या वर्षी देश-विदेशातून अनुयायी अभिवादनासाठी येणार असून आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार लंडन, अमेरिका, कॅनडा, यूएईसह तब्बल 16 देशांतून भीम अनुयायी अभिवादनासाठी येणार आहेत, अशी माहिती कोरेगाव-भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली.

सन 1818च्या लढय़ामध्ये शौर्य गाजवणाऱ्या महार सैनिकांना अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून आंबेडकरी अनुयायी येत असतात. पुढील दोन वर्षांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट देण्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे 2027मध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी गर्दी करतील याची शक्यता लक्षात घेऊन या वर्षीपासूनच त्यानुसार नियोजन सुरू करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत 20पेक्षा अधिक बैठका पार पडल्या आहेत.

या वर्षीच्या उत्सवाला उपमुख्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित रहावे, अशा आशयाचे निमंत्रण समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.