बायको म्हणाली आता थांबू नको, माझ्या माहेरी पळ; नराधम विशाल गवळीसह पत्नीला सात दिवसांची पोलीस कोठडी

कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीच्या पापाच्या कृत्यात बायको साक्षीचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. निष्पाप मुलीचा खून केल्यानंतर साक्षीने विशालला आता तू इथे एक क्षणही थांबू नको, माझ्या माहेरी जा असे म्हणत सोमवारी रातोरात त्याला शेगावला पिटाळले होते. मात्र पोलिसांनी साक्षी आणि विशालचा कॉल ट्रेस केल्यानंतर अवघ्या 24 तासांत शेगावमधून बेडय़ा ठोकत आज त्याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी आरोपी पत्नीला 2 जानेवारी 2025पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी गुन्ह्याचे स्वरूप आणि तपासाची आवश्यकता पाहता आरोपी पती-पत्नीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपी पती-पत्नीला कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

पेहराव बदलला तरी पोलिसांनी ओळखला

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, कल्याण उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस पथके विशालच्या मागावर होती. पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच दाढी काढून आणि पेहराव बदलून शेगावमधून पळण्याच्या तयारीत असताना बुलढाणा पोलिसांनी त्याला अटक करून ठाण्यात आणले.

म्हणून हैवानाची हिंमत वाढली

विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुन्हेगार आहे. गेल्या वर्षी याच पीडित मुलीचा त्याने विनयभंग केला होता. त्याच्याविरुद्ध पोक्सोही दाखल होता. मात्र तो जामिनावर सुटला होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात ठोस कारवाई केली नसल्यामुळेच त्याची हिंमत वाढली आणि त्याने मुलीचा जीव घेतला. या घटनेबद्दल कल्याण, डोंबिवलीत संताप आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष लक्षात घेता विशालला लगेच कल्याणमधील पोलीस ठाण्यात ठेवण्याऐवजी आधी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात ठेवले होते. आज सकाळी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आले.