अल्पवयीन मुलांना रस्त्यात अडवून विनाकारण बोलबच्चनगिरी करून त्यांच्याकडील किमती ऐवज काढून नेणाऱ्या एका भामटय़ाला चेंबूर पोलिसांनी पकडले. त्या भामटय़ाने अजून किती मुलांची फसवणूक करून त्यांच्याकडील किमती ऐवज चोरीला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत राहणाऱ्या कटारे यांचा 16 वर्षांचा मुलगा हा त्याच्या अन्य दोघा मित्रांसमवेत क्लासेसवरून घरी परतत होता. तिघेही पोस्टल कॉलनी परिसरात आले असता एका अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवले. माझ्या भावाचा आयपह्न आणि वॉलेट चोरी झाले असून ते तुम्ही घेतले आहे का? असे विचारून त्याने तिघांना बोलण्यात गुंतवले. मग शिताफीने भीती दाखवत कटारे यांच्या मुलाच्या हातातील सोन्याची अंगठी आणि अन्य मुलांचा मोबाईल घेऊन तो भामटा पसार झाला. घडल्या प्रकाराबाबत तक्रार दिल्यानंतर चेंबूर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासात आरोपी हा शिवाजीनगर परिसरात राहत असल्याचे समजताच उपनिरीक्षक गिरीश माळवे तसेच परदेशी, चव्हाण, तांगडे, तावरे, सूर्यवंशी या पथकाने शिवाजीनगर गाठून अलीराज मोईन हसन सय्यद (30) या भामटय़ाला पकडले.