हिंदुत्वाचा खरा संबंध भारतीयत्वाशी आहे. भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. तसेच ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ नाही, तर ‘सर्वधर्मसमभाव’ असल्याचे महत्त्वाचे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळय़ानिमित्त नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले, आपल्या देशात ‘सेक्युलर’ शब्दाचा बराच प्रचार केला गेला. मधल्या काळात धर्माधर्मात वाद व्हावे म्हणून राजकीय मतांसाठी ‘सेक्युलर’ शब्दाचा वापर झाला; परंतु ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ असा नसून ‘सर्वधर्मसमभाव’ असा आहे. शब्दकोशामध्येही हाच अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.