नराधम वृद्धाला हायकोर्टाचा झटका; अंतरिम जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला

गतिमंद मोलकरणीवर बलात्कार करणाऱ्या 73 वर्षीय वृद्ध नराधमाला उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. बलात्काराच्या गुह्यात शिक्षा भोगत असलेल्या वृद्धाने अंतरिम जामीन देण्याची विनंती केली होती. तथापि, त्याने पीडित तरुणीच्या गतिमंद स्थितीचा गैरफायदा घेऊन अत्याचार केला होता, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला.

23 वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या 73 वर्षीय वृद्धाने आजारपण आणि वृद्धत्वाचे कारण देत अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र त्याने पीडित तरुणीची मानसिक स्थितीचा घेतलेला गैरफायदा आणि पीडित तरुणीची गर्भावस्था लपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पुरावे विचारात घेत न्यायमूर्ती साठये यांनी वृद्धाचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला. बलात्काराची घटना घडली त्यावेळी पीडित तरुणीचा बुद्धय़ांक केवळ 42 टक्के होता. मानसोपचार तज्ञांच्या अहवालात तसा निष्कर्ष नोंदवलेला आहे. त्यामुळे पीडित गतिमंद तरुणीने शरीरसंबंधासाठी दिलेली संमती विचारात घेता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

अपिलावरील सुनावणीला गती

अर्जदार वृद्ध नराधमाला सप्टेंबर 2022 मध्ये सत्र न्यायालयाने बलात्काराच्या गुह्यात दोषी ठरवले आणि 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. ते अपील प्रलंबित असेपर्यंत अंतरिम जामिनावर तुरुंगातून सोडण्याची विनंती त्याने केली होती. न्यायालयाने जामीन नाकारला, मात्र त्याच्या वृद्धत्वाचा विचार करीत अपिलावरील सुनावणीला गती दिली.