लोकसभा निवडणुकीपूर्वी अहोरात्र रामनामाचा जप करणाऱया भाजपला आता प्रभू श्रीरामाचा विसर पडला आहे. महात्मा गांधी यांना प्रिय असणारे ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गायले म्हणून भाजपवाल्यांनी चक्क लोकगायिका देवी यांना माफी मागण्यास भाग पाडले. पाटणा येथील बापू सभागृहात ही घटना घडली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त माजी पेंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी ‘मैं अटल रहूंगा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देवी यांनी महात्मा गांधी यांचे प्रिय ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम’ हे भजन गायले आणि त्यानंतर लगेचच ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ या भजनाची पहिली ओळ गाताच सभागृहात हलकल्लोळ माजला. भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. गायिका देवी यांनी आपण फक्त रामाचे स्मरण केले असे स्पष्ट केले. आयोजकांनीही मध्यस्थी केली. परंतु भाजप कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर गायिका देवी यांनी माफी मागितल्यानंतर तणाव निवळला; परंतु सभागृह रिकामे झाल्याने आयोजकांना कार्यक्रम गुंडाळावा लागला.