हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा ‘सिंह’ डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निर्वाण झाले. वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला ठणठणीत करणारा ‘डॉक्टर’ हरपला असून देशाने एक विद्वान, मृदू, मितभाषी आणि राजकारणातील प्रामाणिक नेता गमावला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रात्री आठ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे अतिदक्षता विभागात त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. तिथेच रात्री 9.50 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
काँग्रेसचा ‘असरदार सरदार’ अशी डॉ. मनमोहन यांची ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बेळगाव येथे होणारी काँग्रेसची जय बापू, जय भीम, जय संविधान सभा तसेच कार्यकारिणी बैठक रद्द करण्यात आली असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व अन्य नेते विशेष विमानाने दिल्लीत परतले.
सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
केंद्र सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्याचवेळी सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
डॉ. मनमोहन सिंग 1990 मध्ये पंतप्रधान चंद्रशेखर यांचे आर्थिक सल्लागार बनले. या काळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. वित्तीय तूट 8.5 टक्क्यांवर गेली होती. देशाच्या परकीय चलन गंगाजळीत केवळ 1 अब्ज डॉलर होते, अशा आर्थिक संकटाच्या काळात नंतर नरसिंह राव पंतप्रधान झाले आणि त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी दिली. 24 जुलै 1991 हा दिवस देशासाठी ऐतिहासिक ठरला. डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था खुली केली. याच मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशाचे दरवाजे विदेशी गुंतवणुकीसाठी उघडले आणि मनमोहन सिंग देशाच्या मुक्त अर्थव्यवस्थेचे जनक ठरले.
- 1982 ते 1985 – भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15वे गव्हर्नर
- 1985 ते 1987 – योजना आयोगाचे उपाध्यक्ष
- 1990 ते 1991 – पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार
- 1991- पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री
- 2001 – राज्यसभेतील विरोधी पक्षनेते
- 2004 ते 2014 – सलग दोन वेळा हिंदुस्थानचे पंतप्रधान
हिंदुस्थानचा सर्वात प्रतिष्ठत नेता – मोदी
हिंदुस्थानने आपला सर्वात प्रतिष्ठत नेता गमावला. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. मनमोहन यांनी एक नामांकित अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवली. सरकारमध्ये अर्थमंत्रिपदासह विविध पदांची जबाबदारी सांभाळली आणि आर्थिक धोरणांवर आपला ठसा उमटवला. संसदेतही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांची छाप सोडली. पंतप्रधान असताना त्यांनी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. ते पंतप्रधान होते तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी आमच्यात सतत संवाद व्हायचा. शासनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा व्हायची. त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता बिनतोड होती, असे मोदींनी नमूद केले.