नवे सरकार येताच मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन पुन्हा चर्चेत

नवे सरकार आले की मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील एक दालन नेहमी चर्चेत येते. दालन क्रमांक 602. महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांना दालनांचे वाटप झाले. त्यात 602 क्रमांकाचे दालन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मिळाले आहे. भूतकाळात घडलेल्या काही घटनांमुळे या दालनाबद्दल अंधश्रद्धा पसरली आहे ती आजही कायम आहे.

1999 मध्ये हे दालन तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले होते, पण 2003 मध्ये ते तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात अडकले. जलसंपदा मंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात नाव आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे यांना हे दालन मिळाले, पण जमीन घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर झाले आणि प्रकरण राजीनाम्यापर्यंत गेले. पांडुरंग फुंडकर यांनाही हे दालन मिळाले होते. 2018 मध्ये त्यांचे अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अनिल बोंडे यांनी या दालनात प्रवेश केल्यानंतर 2019 मधील निवडणुकीत त्यांचा अनपेक्षितपणे पराभव झाला होता.

सध्या हे दालन छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांच्या सामाजिक कार्य विभागाला देण्यात आले आहे. परंतु ते त्या दालनाऐवजी बाजूचे दालन वापरत आहेत. छत्रपती राजाराम महाराज पालथे जन्माला आले होते तेव्हा सर्वांनी चिंता व्यक्त केली होती, पण शिवरायांनी हा पातशाहीला पालथा करेल असे म्हटले होते. शिवरायांनी कधीच अंधश्रद्धा मानली नाही. त्यांच्या बहुतांश मोहिमा अमावास्येच्या रात्री झाल्या. त्यामुळे शिवेंद्रराजेही अशा अंधश्रद्धांना भीक घालणार नाहीत असे त्यांचे समर्थक सांगतात.