आजही दुबळ्या विंडीजचा फडशा पडणार, निर्भेळ यश मिळविण्यासाठी हिंदुस्थानी महिला संघ सज्ज

दोन आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाची झळ सोसणाऱया हिंदुस्थानी महिला आता दुबळय़ा विंडीजचा सलग तिसऱया एकदिवसीय सामन्यातही फडशा पाडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने पहिल्या दोन्ही सामन्यांत मोठय़ा विजयांची नोंद करत मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना केवळ औपचारिकता पूर्ण करणारा असला तरी हिंदुस्थानी महिला विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी उत्सुक आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हिंदुस्थानी महिलांना ऑस्ट्रेलियन संघाने एकापाठोपाठ एक असे सलग तीन धक्के दिले होते. त्या मालिकेत स्मृती मानधनाचा अपवाद वगळता हिंदुस्थानच्या महिलांना आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. आताही स्मृतीचीच बॅट सातत्याने तळपतेय. तिने सलग सहा सामन्यांत अर्धशतकी खेळी करत धमाका केला आहे. त्यातच हरलीन देओलनेही आपले पहिलेवहिले शतक ठोकत सर्वांना धक्का दिलाय. हिंदुस्थानी महिलांनी पहिल्या सामन्यात 211 तर दुसऱया सामन्यात 115 धावांनी जोरदार विजय मिळवले आहेत. तिसऱया सामन्यातही हिंदुस्थान आणखी एक मोठा विजय मिळवत ऑस्ट्रेलियातील पराभवाच्या हॅटट्रिकचे दुःख काहीसे कमी करण्याचे प्रयत्न करणार आहे.