धडाकेबाज फलंदाज शुबमन गिलसाठी 2024 साल फारसे समाधानकारक गेले नाहीच. वर्षाच्या शेवटच्या कसोटीत म्हणजेच बॉक्सिंग डे कसोटीत त्याला रोहित शर्मा आणि संघहिताचे कारण देत शेवटच्या क्षणी वगळण्यात आले. अपयशी कर्णधार रोहित शर्माला सलामीला खेळता यावे म्हणून संघहितासाठी त्याला अंतिम संघात स्थान मिळू शकले नाही. खरं सांगायचे तर रोहित शर्माला सावरण्यासाठी संघहिताचा मुलामा चढवत गिलचा बळी घेतला गेल्याचे बोलले जातेय. हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाचा हा जुगार यशस्वी ठरला तर सर्वांना गिलवर झालेल्या अन्यायाचा विसर पडेल. मात्र हा जुगार उधळला गेला तर रोहित शर्माला याची सव्याज भरपाई करावी लागणार, हेही तितकेच खरे आहे.
रोहित शर्माची वर्षभर सुरू असलेली अपयशाची मालिका ऑस्ट्रेलियातही संपण्याची काही चिन्हेच दिसत नाहीय. त्यामुळे रोहितला आघाडीला खेळवून त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी संघव्यवस्थापन धडपडत आहे. त्यातच हिंदुस्थानी संघाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातील आव्हान कायम राखण्यासाठी एमसीजीवर विजयाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. हा सामना जिंकला तर हिंदुस्थानचे डब्ल्यूटीसीमधील आव्हान कायम राहील, अन्यथा हिंदुस्थानचे सलग तिसऱयांदा अंतिम फेरीत खेळण्याचे आव्हान संपुष्टात येईल. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानचे आव्हान संपले तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याची वेळ येऊ शकते. सध्या दोघांचा फॉर्म पाहता सिडनी कसोटीत दोघेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र हिंदुस्थानचे डब्ल्यूटीसीचे आव्हान जिवंत राहिले आणि अंतिम फेरी गाठली तर दोघेही महान आपली निवृत्ती ऐतिहासिक लॉर्ड्सवर जाहीर करतील, असे अंदाज आतापासून वर्तवले जात आहे. हे जरतरचे अंदाज जुळून आणण्यासाठी संघव्यवस्थापनाने गिलला संघाबाहेर काढण्याचे धाडस दाखवले आहे. तसेही गिलने या वर्षी 12 कसोटींत 43.30 च्या सरासरीने 866 धावा केल्या आहेत. गेल्या तीन डावांत गिलला एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. त्याने 31, 28, 1 अशा अपयशी खेळय़ा केल्यामुळे त्याचे संघातील स्थान आधीच डळमळीत झाले होते. याचाच फायदा घेत संघव्यवस्थापनाने गिलची विकेट काढली आहे. त्याला डावलल्यामुळे आधीच कमकुवत असलेली हिंदुस्थानची फलंदाजी आणखीनच दुबळी झाली आहे.