पहिला दिवस ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा, आघाडीच्या चार फलंदाजांनी ठोकली दमदार अर्धशतके; ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दिवशी 6 बाद 311 धावा

बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस पदार्पणवीर सॅम कोन्स्टास आणि ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी गाजवला. आघाडीवीरांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर (बॉगाक) ट्रॉफीतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी 86 षटकांत 6 बाद 311 धावसंख्येपर्यंत मजल मारली. पदार्पणवीर सॅम कॉन्स्टस (60), उस्मान ख्वाजा (57), मार्नस लाबुशन (72) व स्टीव्हन स्मिथ (खेळत आहे 68) या फलंदाजांनी दमदार अर्धशतके ठोकून आपल्या संघाला पहिल्याच दिवशी तीनशेपार नेले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार पॅट कमिन्स 8 धावांवर स्टीव्हन स्मिथला साथ देत होता.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. 19 वर्षीय सलामीवीर सॅम कॉन्स्टस व उस्मान ख्वाजा यांनी 19.2 षटकांत 89 धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला खणखणीत सलामी दिली. वेगवान गोलंदाज अपयशी ठरत असताना कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जाडेजाला मोर्चावर आणले. त्याने कोन्स्टासला आपल्या फिरकीच्या जाळय़ात अडकवत पायचीत पकडले व हिंदुस्थानला पहिला विकेट मिळवून दिला. कॉन्स्टसने 65 चेंडूंत 60 धावा करताना 6 चौकार अन् 2 षटकार ठोकले. मग बुमराने ख्वाजाचा अडसर दूर केला. 121 चेंडूंतील संयमी खेळीत 6 चौकारांसह 57 धावा करणाऱया ख्वाजाने लोकेश राहुलकडे झेल दिला.

सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर मार्नस लाबुशन व स्टीव्हन स्मिथ यांनी तिसऱया विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. लाबूशेनने 145 चेंडूंत 7 चौकारांसह 72 धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने 66 व्या षटकात त्याला कोहलीकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला तिसरे यश मिळवून दिले. मग जसप्रीत बुमराने ट्रव्हिस हेड (0) व मिचेल मार्श (4) यांना स्थिरावण्यापूर्वीच बाद करून ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. त्याने हेडचा त्रिफळा उडविला, तर मार्शला यष्टीमागे पंतकरवी झेलबाद केले. मग अॅलेक्स पॅरीने 31 धावांची खेळी करीत स्मिथला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. आकाश दीपने पॅरीला यष्टीमागे झेलबाद करून हिंदुस्थानला सहावे यश मिळवून दिले. हिंदुस्थानकडून बुमराने 3 फलंदाज बाद केले, तर आकाश दीप, रवींद्र जाडेजा व सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

बुमराच्या गोलंदाजीवर 4562 चेंडूंनंतर षटकार

टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 4562 चेंडूंनंतर षटकार ठोकला गेला. पदार्पणवीर सॅम कॉन्स्टसनेच हा षटकार ठोकला. त्याने बुमराच्या 11व्या षटकांत 2 चौकार व एका षटकारासह 18 धावा कुटल्या. बुमराच्या कसोटी कारकीर्दीतील हे सर्वात महागडे षटक ठरले, हे विशेष. याचबरोबर बुमरा हा मेलबर्नच्या मैदानावर सर्वाधिक विकेट टिपणारा हिंदुस्थानी गोलंदाज बनलाय. या कसोटीपूर्वी माजी फिरकीवीर अनिल कुंबळे व बुमरा 15-15 बळींसह बरोबरीत होते, मात्र गुरुवारी बुमराने मेलबर्नवर 3 विकेट टिपत पुंबळेला मागे टाकले. त्याने या कसोटीत विकेट टिपले, तर मेलबर्नवर सर्वाधिक कसोटी विकेट टिपणारा आशियातील गोलंदाजांचा विक्रम बुमराच्या नावावर जमा होईल. सध्या पाकिस्तानचा माजी गोलंदाज सरफराज नवाजच्या नावावर हा विक्रम असून त्याने 4 सामन्यांत 22 विकेट टिपलेले आहेत.

‘विराट’ कोहलीचे ‘बालीश’ कृत्य

क्रिकेटविश्वातील स्टार फलंदाज असलेल्या विराट कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूने ऑस्ट्रेलियाचा नवखा सलामीवीर सॅम कॉन्स्टसशी हुज्जत घातली. क्रिकेटमध्ये ‘विराट’ असलेल्या कोहलीचे हे बालीश कृत्य सर्वांनाचा खटकले. त्याने पदार्पणवीर कॉन्स्टसशी आधी हुज्जत आणि नंतर धक्का मारण्याचे कृत्य केले.

दहाव्या व अकराव्या षटकात ही घटना घडली. मॅच रेफरी अॅण्डी पायक्रॉफ्ट यांनी या गैरवर्तणुकीमुळे कोहलीवर दंडात्मक कारवाई करीत त्याला एक डीमेरिट पॉइंटही दिला. कोहलीच्या सामन्यातील मानधनापैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली. सुनावणीदरम्यान कोहलीचे आपली चूक कबूल केली. पहिलीच कसोटी खेळणाऱया 19 वर्षीय कॉन्स्टसशी गैरवर्तन केल्याने कोहली सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोलचा धनी ठरत आहे.

वेगवान अर्धशतक ठोकणारा कॉन्स्टस तिसरा ऑस्ट्रेलियन

सॅम कॉन्स्टस हा पदार्पणाच्या कसोटीत वेगवान अर्धशतक ठोकणारा तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. त्याने 52 चेंडूंत अर्धशतक ठोकले. त्याच्याआधी अॅडम गिलख्रिस्टने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना 46 चेंडूंत अर्शशतक पूर्ण केले होते. याचबरोबर एश्टन एगरने 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत 50 चेंडूंत अर्धशतक झळकाविले होते. याचबरोबर कॉन्स्टस हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात तरुण कसोटी सलामीवीर ठरलाय. तो 19 वर्षे व 85 दिवस वयाचा आहे.