मुंबईकरांची घुसमट, शहरभर विषारी धुरक्याचे साम्राज्य, आरोग्याला हानीकारक प्रदूषण; हवेची गुणवत्ता प्रचंड खराब

मुंबई शहर व उपनगरांत गुरुवारी सायंकाळी प्रदूषणाने आरोग्याला हानीकारक ठरणारी धोकादायक पातळी गाठली आणि मुंबईकरांची प्रचंड घुसमट केली. संपूर्ण शहरभर विषारी धुरक्याचे साम्राज्य होते. या धुरक्यामुळे शेजारच्या इमारतीही दिसेनाशा झाल्या होत्या. हवेची गुणवत्ता ‘प्रचंड खराब’ पातळीवर नोंद झाली. बोरिवली पूर्वेकडे सर्वाधिक प्रदूषित हवा होती. तिथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक 270 इतका नोंद झाला. वाढत्या प्रदूषणावर आरोग्य व पर्यावरणतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रदूषणाने धडकी भरवली आहे. हे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतेच राहिले आहे. गुरुवारी सकाळी आणि सायंकाळी शहराच्या बहुतांश भागांत ‘खराब’ आणि ‘अतिखराब’ अशा आरोग्याला हानीकारक ठरणाऱ्या पातळय़ांवर प्रदूषण होते. शहरात चर्चगेट, मरिन ड्राइव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, भायखळा, दादर, लालबाग, परळ परिसरात सकाळपासूनच प्रदूषण ठाण मांडून होते. सायंकाळी हे प्रदूषण तीव्र झाले. उपनगरांतही हीच चिंताजनक परिस्थिती होती. अगदी बोरिवलीपासून अंधेरी, भांडुप, घाटकोपर, चेंबूरच्या भागांत प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली. सर्वत्र विषारी धुरके पसरले आणि रहिवाशांना श्वास घेतानाही प्रचंड त्रास होऊ लागला. दिवसेंदिवस प्रदूषण वाढतेच असल्याने अधिकाधिक मुंबईकर मास्क वापरू लागले आहेत. पालिका प्रशासनाने धूळ नियंत्रणात आणण्याकामी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र पालिकेचे ते प्रयत्नही तोकडे पडू लागले आहेत.

दमा आणि श्वसनविकाराचा त्रास असलेल्या नागरिकांना प्रदूषणाचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. रुग्णालयांत सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नियम मोडणाऱ्या बांधकाम प्रकल्पांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे.

 हवेची गुणवत्ता निर्देशांक

बोरिवली पूर्व        270

मालाड पश्चिम     242

देवनार                205

माझगाव             207

नेव्ही नगर, कुलाबा 229

सिद्धार्थ नगर, वरळी 188

कांदिवली पश्चिम 211