>> विजय पांढरीपांडे
अतुल सुभाष या तरुणाची आत्महत्या जितकी चिंताजनक त्याहीपेक्षा त्याने मृत्यूपूर्वी केलेला व्हिडीओ गंभीर अन् विचार करण्यालायक आहे. महिलांवरील अत्याचाराची सर्व क्षेत्रांकडून ताबडतोब दखल घेतली जाते. त्याकडे विशेष सहानुभूतीने पाहिले जाते, पण गेल्या काही वर्षांत महिलांकडून पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराची, सूडभावनेची, बदला घेण्याची प्रकरणे वाढली आहेत. महिलांना पोलिसांकडून म्हणा किंवा कायद्याने न्यायालयाकडून म्हणा विशेष महत्त्व मिळत असल्याने व त्यांच्याकडे सॉफ्ट कॉर्नरने बघण्याची समाजाची भूमिका असल्याने अनेक केसेसमध्ये पुरुषावर अप्रत्यक्षपणे अन्याय होतो.
या युगात शिक्षण घेतलेल्या तरुणी सक्षम झाल्या आहेत. त्यांच्या आशा-अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनाही त्यांची स्वतंत्र स्पेस हवी आहे. त्यांच्या स्वातंत्र्याच्या वेगळ्या व्याख्या आहेत. पूर्वीसारख्या त्या शरणागत नाहीत. पुरुषावर अवलंबून नाहीत. आजकालच्या मुलीची लग्न संबंधावेळची अपेक्षांची यादी बघितली तरी त्यांच्या बदललेल्या दृष्टिकोनाची सहज कल्पना येते. भावना, नाती जपणे याला महत्त्व राहिले नाही. व्यवहारात कोरडेपणा आला आहे. स्वार्थ बोकाळला आहे. मटेरियलिजम वाढला आहे.
अतुल सुभाषची केस अत्यंत केविलवाणी, हृदयद्रावक आहे. त्याला आर्थिकदृष्टय़ा तर लुबाडले गेलेच, पण त्याचा क्रूर मानसिक छळदेखील झाला. स्त्रियांकडून अनेकदा पुरुषांचे इमोशनल ब्लॅकमेलिंगदेखील होते. आपल्या साहित्यात, पुराणात, इतिहासात स्त्रियांची जी शालीन, मायाळू, प्रेमळ, दयाळू प्रतिमा रंगवली गेली आहे, तिला छेद देणाऱ्या घटनांची संख्या आजच्या समाजात दिसून येते.
पूर्वी नाटक व चित्रपटात खलनायक असायचेच. ते अत्याचार करताना दाखवले जायचे. आता हे प्राण, प्रेम चोप्रा, सदाशिव अमरापूरकर टाईप पॅरेक्टर्स गायब झाले आहेत. टीव्हीवरील मालिकांत तर यांची जागा स्त्री पात्रांनी घेतली आहे. आश्चर्य म्हणजे हे स्त्री खलपात्र रंगविणाऱ्या लेखिका, दिग्दर्शिका, संवाद लेखिकादेखील स्त्रियाच असतात.
वाढता चंगळवाद, त्यातून घरातील प्रत्येक घटकाला मिळालेले मुक्त स्वातंत्र्य अन् या स्वातंत्र्याचा दुरुपयोग या सर्वाला कारणीभूत आहे. पूर्वी आपल्याकडेच नव्हे, तर जागतिक पातळीवर स्त्रियांची गळचेपी व्हायची. त्यांना समाजात नेहमीच दुय्यम स्थान दिले जायचे. शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवले गेले. विधवांची अवहेलना झाली. हे सगळे निश्चितच निषेधार्ह होते यात दुमत नाही. अनेक कादंबऱयांतून, नाटकांतून, सामाजिक चळवळींतून स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा पह्डली गेलेली आपण पाहतो. परिणाम स्वरूप गेल्या सात-आठ दशकांत एकूणच जागतिक पातळीवर परिस्थिती आरपार बदलली. स्त्रियांसाठी खास कायदे, सोयी सवलती झाल्या. प्रत्येक क्षेत्र त्यांच्यासाठी खुले झाले. आता तर असे कोणतेही क्षेत्र राहिले नाही जिथे स्त्रियांना प्रवेश नाही. त्यामुळे त्यांचे बौद्धिक, शारीरिक सामर्थ्य दाखविण्याची संधी त्यांना मिळाली हेही तितकेच खरे.
मिळालेले स्वातंत्र्य आपण किती जबाबदारीने सांभाळतो, उपयोगात आणतो यावर बरेच काही अवलंबून असते. संसारात नवरा-बायको दोघांनीही परस्परांना सन्मानाने वागविले, समजून घेतले तर अर्धेअधिक प्रश्न सुटतील. प्रश्न अहंकाराचा (इगो) असतो. माझेच बरोबर या अट्टहासाचा असतो. दुसऱ्या पार्टनरला कमी लेखण्याचा असतो. मुख्य म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात संवाद कमी झाला आहे. दोघांनी एकत्र बसून, प्रसंगी वाडवडिलांचा सल्ला घेऊन अनेक प्रश्न सहज सुटू शकतात, पण आपण आपला हेका पुढे रेटत नेण्याचेच धोरण ठेवले तर मात्र संघर्षाच्या ठिणग्या उडून आग लागते. त्यात दोघांच्याही आयुष्याची राख होते. अतुल सुभाषच्या बाबतीत तेच घडले. पत्नीच्या अन् तिला साथ देणाऱ्या स्त्रियांच्या त्रासाला पंटाळून आत्महत्या केली. आता तरी अशा केसेसकडे बघण्याचा समाजाचा अन् न्यायालयाचा दृष्टिकोन बदलेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तशीही न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी आता उघडली आहे. न्यायालयाच्या खंडपीठात सर्व न्यायधीशांचे अधिकार समान असतात. सर्वांचा अधिकार समान असतो. संसाराच्या बाबतीतदेखील नवरा-बायको समान पातळीवर जगले, वागले तर बरेच प्रश्न सहज सुटतील. घरातील सर्वांचे जगणे अधिक सुसह्य, सुंदर होईल. अशा घटनांपासून आपण सर्वांनीच धडा घेतला पाहिजे.