काँग्रेस ‘संविधान बचाओ पद यात्रा’ काढणार, CWC च्या बैठकीत कोणते प्रस्ताव झाले मंजूर? जाणून घ्या

काँग्रेस पक्ष येत्या 26 जानेवारीपासून देशभरात ‘संविधान बचाओ पद यात्रा’ काढणार आहे. आज काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, आम्ही सीडब्ल्यूसीमध्ये दोन प्रस्ताव मांडले. पहिला महात्मा गांधींवर आणि दुसरा राजकीय प्रस्तावावर. काँग्रेस 2025 मध्ये संघटनात्मक सुधारणा कार्यक्रम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याअंतर्गत प्रत्येक स्तरावरील नेत्यांची क्षमता कसून तपासली जाईल. याशिवाय 26 जानेवारी 2025 पासून संपूर्ण वर्षभर संविधान बचाओ पद यात्रा काढणार आहे, असंही ते म्हणाले.

याचबाबत बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, भारत जोडो यात्रेने काँग्रेसला संजीवनी दिली आणि ती काँग्रेसच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली, असा आमचा विश्वास आहे. यानंतर भारत जोडो न्याय यात्रा निघाली आणि आता 26 जानेवारी 2025 रोजी आम्ही एक वर्षभर चालणारी ‘संविधान बचाओ पद यात्रा’ सुरू करणार आहोत.

जयराम रमेश म्हणाले, ”उद्या बेळगावमध्ये ‘जय बापू, जय भीम आणि जय संविधान’ रॅली काढणार आहोत. यानंतर एक वर्षासाठी ‘संविधान बचाओ पद यात्रा’ काढण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक राज्यात गावोगावी पदयात्रा काढण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व मोठे नेते सहभागी होणार आहेत. यामध्ये राज्यघटना, आर्थिक व्यवस्था, लोकशाही, निवडणूक आयोग, अदानी यासह सर्व मुद्दे मांडले जाणार आहेत.”