शेतकऱ्यांनी घडवली जलक्रांती! ‘सागदरा उपसा सिंचन’ योजना एकीच्या बळावर केली पूर्ण, सर्वत्र कौतुक

धामणी (ता.आंबेगाव) येथील ‘सागदरा उपसा सिंचन’ योजनेच्या माध्यमातून साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत उपसा सिंचन योजना पूर्ण करत दुष्काळग्रस्त भागात जलक्रांती घडवून आणली आहे, शेतकऱ्यांच्या या एकीच्या बळावर केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील धामणी हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते आहे.या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दरवर्षी दुष्काळ ठरलेला. त्यातच पूर्व भागातील लोणी धामणी सह सहा गावांना वरदान ठरणारी म्हाळसाकांत जलसिंचन योजना अजूनही मार्गी लागत नसल्याने या परिसरात शेतकरी एकत्र येत स्वखर्चाने डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून आठ दहा किलोमिटर वरून पाईप लाईन करत आहेत.

धामणीतील चाडदरा येथील तब्बल आठ शेतकऱ्यांनी एकत्र येत सागदरा उपसा सिंचन योजना या नावाने संस्था रजिस्टर करून त्या माध्यमातून कुठलीही सरकारी आर्थिक मदत न घेता अंदाजे एक कोटी रक्कम खर्च करून ही योजना आज पूर्णत्वास नेली आहे. या सर्व शेतकऱ्यांसाठी बुधवार दि.25 डिसेंबर हा दिवस स्मरणात राहणारा आहे. या दिवशी पाणी शेवटच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर झालेला ‘सदा आनंदाचा येळकोट’ चा जयघोष केलेल्या कष्टाला फळ आल्याची साक्ष देत होते. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उताऱ्यावरती जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज काढून ही योजना पूर्णत्वास नेली आहे. तसेच काही शासकीय यंत्रणा,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांनी देखील इतर सहकार्य ही योजना पूर्ण करण्यासाठी केले आहे. शिवाय कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी वर्ग तसेच इतर सर्वांच्या सहकार्याने आज हा दिवस उजाडला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सागदरा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी आज ही जलक्रांती केली आहे. त्यांच्या या क्रांतिकारी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे