निवडणुकीआधी महिलांना पैसे वाटप? भाजप नेत्यांविरोधात ED कडे ‘आप’ने दाखल केली तक्रार

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. यातच निवडणूक जाहीर होण्याआधी भाजप नेते प्रवेश वर्मा यांनी दिल्लीत महिलांना पैसे वाटप केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्यावर रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. यानंतर आता आपने प्रवेश वर्मा यांच्याविरोधात ईडीत तक्रार दाखल केली आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी ईडी कार्यालयात पोहोचत ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर आप खासदार संजय सिंह म्हणाले, ”ईडी कार्यालयांनी तक्रार पत्र स्वीकारले आहे. मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने आम्हाला कोणत्याही प्रकारच्या कारवाईचे आश्वासन दिले नाही. ईडी काय करेल हे मी सांगू शकत नाही. त्यांनी तक्रारीची अधिकृत पावती दिली आहे.”

दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्यावर रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. आतिशी म्हणाल्या होत्या की, नवी दिल्ली विधानसभेत भाजप लोकांचे मतदार ओळखपत्र पाहून त्यांना पैसे वाटप करत आहे. भाजप नेते प्रवेश वर्मा यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. आतिशी यांनी एक फोटो शेअर करत दावा केला की, नवी दिल्लीतील भाजप नेते परवेश वर्मा यांचे अधिकृत निवासस्थान 20 विंडसर प्लेस येथे महिलांना 1100 रुपये वाटले जात आहेत.

आतिशी यांनी ईडी-सीबीआय आणि दिल्ली पोलिसांना परवेश वर्मा यांच्या घरावर छापा टाकण्याचे आवाहनही केले होते. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतूनच निवडणूक लढवतात. आतिशी म्हणाल्या की, ”प्रवेश वर्मा खासदार म्हणून मिळालेल्या सरकारी बंगल्यात वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधून महिला मतदारांना बोलावले होते. त्यांचा मतदार ओळखपत्र तपासल्यानंतर एक फॉर्म भरण्यात आला आणि प्रत्येक महिलेला लिफाफ्यात 1100 रुपये देण्यात आले.”