दोन व्यापाऱ्यांकडून दीड टन प्लॅस्टिक जप्त, संगमनेर नगरपरिषदेची कारवाई; प्रत्येकी 25 हजारांचा दंड

संगमनेर नगरपरिषदेने शहरातील दोन प्लॅस्टिक विक्रेत्यांवर छापा टाकत पालिकेच्या पथकाने दीड टन प्लॅस्टिक जप्त केले. यात बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे. संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून रामदास कोकरे यांनी पदभार घेतला होता. कोकरे यांनी पदभार घेतल्यानंतर पालिकेच्या पथकाला बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेच्या पथकाकडून सातत्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून प्लॅस्टिक जप्तीची कारवाई केली जात होती.

एकीकडे किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे मात्र या पिशव्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप होत होता. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी शहरातील बड्या प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. अखेरीस शहरातील प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात पालिकेला यश आले आहे.

दोन्ही व्यापाऱ्यांना प्रत्येकी 25 हजारांचा दंड

मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पंजाबी कॉलनीत असलेल्या ‘साईराज ट्रेडर्स’ या दुकानावर आणि परदेशपुरा भागात असलेल्या अरुण गवंडी यांच्या गोडाऊनवर राजेश गुंजाळ, प्रल्हाद देवरे, साजीद पटेल, प्रदीप माळवणकर, अमजद पठाण, सतीश बुरुंगले आदींच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत पथकाने सिंगल वापरासाठीच्या प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक चमचे, ग्लास, डिश आदी वस्तूंचा सुमारे दीड टन साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही व्यापाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंडदेखील आकारण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

पालिकेने सिंगल युज प्लॅस्टिक पिशव्या, तसेच प्लॅस्टिकच्या वस्तू वापरावर व विक्रीवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यापुढील काळात प्लॅस्टिकविरोधी मोहीम अधिक तीव्र करणार आहे. ‘प्लॅस्टिकमुक्त शहर’ची संकल्पना राबविण्यासाठी नागरिकांनी कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

रामदास कोकरे, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद