जिंदाल पोर्ट वायूगळतीचा अहवाल चार दिवसांत येणार; तज्ज्ञांनी घेतले नमुने

जिंदाल पोर्ट कंपनीच्या वायूगळतीची चौकशी केमिकल इंजिनिअरकडून सुरु करण्यात आली आहे. इथेनॉल मरकॅप्टनची जिथून वायूगळती झाली तेथून ते शाळेपर्यंत अनेक नमुने घेण्यात आले आहेत. पुढील चार दिवसांत त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. वायूगळती चौकशी समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आणि सचिव प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली.

केमिकल इंजिनिअर प्राध्यापक मनिषकुमार यादव यांच्यामार्फत ही तांत्रिक चौकशी सुरु करण्यात आली आहे. 12 डिसेंबर रोजी जिंदाल कंपनीमध्ये वायूगळती होऊन शेजारी असलेल्या माध्यमिक विद्यामंदिरमधील 68 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती. जिंदाल पोर्ट कंपनीच्या परिसरात असलेल्या एलपीजी गॅस टँकर पार्किंगमधून ही गळती झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या पुढे आले आहे. प्राध्यापक मनिषकुमार यादव यांच्या पथकाने जिंदाल पोर्ट कंपनीच्या या वायूगळतीची तपासणी सुरु केली आहे. पुढील चार दिवसात याचा अहवाल आल्यानंतर नेमकी वायूगळती कशामुळे झाली आणि त्याची तीव्रता काय होती हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रा.मनिषकुमार यादव यांनी माध्यमिक विद्यामंदिरला भेट दिली आणि तेथील मुख्याध्यापकांशी चर्चा केली.