पाकड्यांचा घुसखोरीचा डाव जवानांनी उधळला; एका घुसखोराला कंठस्नान

जम्मू- कश्मीर, राजस्थान, पंजाब या पाकिस्तानी सीमोजवळ थंडी वाढू लागली आहे. या वाढत्या थंडीचा गैरफायदा घेत दरवर्षी पाकिस्तानकडून घुसखोरीचा कट आखण्यात येतो. पाकिस्तानमधून काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. सीमा सुरक्षा दलाचे जवान सतर्क असून त्यांनी पाकड्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. तसेच एका घुसखोराला कंठस्नान घातले आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान सीमाभागत नेहमीच तणावपूर्ण वातावरण असते. पाकड्यांचा हिंदुस्थानी सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न बीएसएफ जवानांनी हाणून पाडला. राजस्थानच्या गंगानंगरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घालण्यात बीएसएफ जवानांना यश आले. तो घुसखोर हिंदुस्थानी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना जवानांनी त्याचा खात्मा केला. त्याच्याकडून पाकिस्तानी चलन आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

सीमेवर सैनिक गस्त घालत होते. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या सैनिकांना पाहून घुसखोर पळू लागला. सैनिकांनी इशारा देत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बीएसएफने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, घुसखोर पाकिस्तानातून भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. सैनिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. घुसखोराकडून पाकिस्तानी चलन आणि इतर संशयास्पद वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. या भागात आणखी काही घुसखोर असण्याची शक्यता असल्याने जवान सतर्क आहेत.

दरवर्षी थंडीचा काळ सुरू होताच पाकिस्तानकडून घुसखोरीचे कट आखण्यात येतात. त्यामुळे या काळात जवानांना अधिक सतर्क राहवे लागत आहे. हे घुसखोर जम्मू आणि कश्मीर खोऱ्यात घातपाती कारवाय घडवतात. तसेच तरुणांची माथी भडकवत वातावरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आमचे जवान सतर्क असून पाकिस्तानचे घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जातील, असा विश्वास हिंदुस्थानी लष्कराने व्यक्त केला आहे.