कल्याण-डोंबिवली महापालिकेत पदोन्नतीपासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती देण्याचा निर्णय विभागीय पदोन्नती समितीने घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे एकाच जागेवर काम करणारे कर्मचारी आता साहेब बनले आहेत. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पदोन्नतीचे आदेश जारी केल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पालिकेतील विविध विभागांतील कर्मचारी अनेक वर्षांपासून या पदोन्नतीची वाट पाहात होते. अनेक कर्मचारी या प्रतीक्षेतच सेवानिवृत्त झाले. या पदोन्नतीसाठी कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, न्यायालयीन प्रकरणे, सेवाज्येष्ठता आणि अनुभव या सर्व बाबींचा विचार करण्यात आला. महापालिकेतील म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, कार्याध्यक्ष अजय पवार, शिवसेना शहरप्रमुख आणि सरचिटणीस सचिन बासरे, उपाध्यक्ष सुनील पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आयुक्तांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी पाठपुरावा केला होता.
सर्व विभागांना न्याय
पालिकेने विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. यामध्ये सचिव म्हणून किशोर शेळके यांना पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर अधीक्षक 9, वरिष्ठ लिपिक 63, लिपिक टंकलेखक 59, शिपाई 7, लेखापाल 12, उपअभियंता 18, स्वच्छता निरीक्षक 25, मुकादम 94, थिएटर अॅटेंडन्ट 15, उपअग्निशमन अधिकारी 8, परिचारिका प्रमुख 6 अशा एकूण 343 कर्मचाऱ्यांना महापालिकेने पदोन्नत्ती दिली आहे
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. या पदोन्नतीसाठी आम्ही आयुक्तांशी वेळोवेळी चर्चा केली होती. अखेर या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून सेवाज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना याचा लाभ झाला आहे.
सचिन बासरे, सरचिटणीस