बंदी आदेशानंतरही नायलॉन मांजाची काटाकाटी! जीवाच्या भीतीने वाहनधारकांनीच ‘सुरक्षा कवच’चा केला जुगाड

अनेकांचे गळे चिरून त्यांच्या जीवितांशी खेळ झाल्यानंतर न्यायालयाने नायलॉन मांजासंदर्भात पोलिसांना नायलॉन मांजावर बंदीची कठोर अंमलबजावणी करा, असे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही शहरात नायलॉन मांजाने काटाकाटी सुरूच आहे. पोलिसांकडून कारवाया होत असल्या तरी नायलॉन मांजाचा नायनाट करण्यात ते अपयशी ठरले असल्याने वाहनधारकांनी जीवाच्या भीतीने सुरक्षा कवचचा जुगाड केला आहे.

संक्रांतीला राज्यभरात पतंग महोत्सव साजरा केला जातो. शहरातही अनेक हौशी पतंगबाजी करत मौजमजा करतात. गेल्या काही वर्षांपासून या पतंगबाजीसाठी चायना मांजा बाजारात दाखल झाला आणि पतंगबाजीतून शहराच्या जीवाचा धोका सुरु झाला. नॉयलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून बनविला असल्याने तो सहजासहजी तुटत नाही. काटाकाटीत पतंग कटल्यानंतर हा मांजा हवेतून त्या-त्या भागातील रस्त्यावर पडतो. रस्त्यावरून या दरम्यान ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या गळ्याला अडकून तो कापला जातो. गळा आवळला गेल्याने अनेक वाहनधारक जागीच थांबतात त्यामुळे त्यांचा गळा चिरला जातो. एखादा वाहनधारक वाहन थांबवू न शकल्यास त्याचा गळा पूर्णपणे कापला जाण्याची भीती असते.

संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर डिसेंबर महिन्यापासून पतंगबाजी सुरू झाली आहे. अनेकांनी बंदी असतानाही काटाकाटीसाठी नॉयलॉन मांजाचा वापर सुरू केला असल्याने आतापर्यंत शहरात तब्बल 8 जणांचे गळे कापले गेले आहे. मागील तीन-चार वर्षांत शेकडो जणांचे गळे आणि डोळे या नायलॉन मांजाने कापले आहेत. या गंभीर घटनानंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयानेही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी शहरात पतंगबाजीसाठी नायलॉन मांजावर बंदी आणली. या बंदी नंतरही शहरातील तरुणाईकडून सर्रास नायलॉन मांजाचा वापर सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने शहरवासीयांचा जीव टांगणीला आहे. दरदिवशी शेकडो वाहनधारक जीव मुठीत घेऊन दुचाकीने प्रवास करीत आहेत. दरम्यान, पडेगाव येथील एका गॅरेजवाल्याने जीवाच्या भीतीने दुचाकीला सुरक्षा कवच तयार केले आहे. एकीकडे दुचाकीवाल्यांनी या नायलॉन मांजा धसका घेतलेला असताना या गॅरेजवाल्याने गेलेल्या जुगाडाची चर्चा सुरू आहे. पोलीस शहरातून कायमस्वरूपी नायलॉन मांजा हद्दपार करतील तेव्हा करतील, आपण आपला जीव वाचविण्यासाठी हे सुरक्षा कवच दुचाकीला बसविणे गरजेचे झाले असल्याने अनेक दुचाकीस्वारांचे पावले या गॅरेजवाल्यांकडे वळत आहे.

संदीप भालेकरने असा केला जुगाड

नायलॉन मांजामुळे अख्खा गळाच कापला जाण्याची भीती असल्याने जीव वाचविण्यासाठी पडेगाव येथील छत्रपती ऑटो गॅरेजचे मालक संदीप भालेकर यांना संकल्पना सुचली. दुचाकी चालविताना मांजा गळात अडकूच नये, यासाठी त्यांनी दुचाकीच्या समोरील भागात म्हणजे हॅण्डलवर रॉडचा उलटा यू दीड फूट आकाराचा अँगल तयार केला. साईड मिररच्या नटबोल्टमध्ये हा अँगल लावण्यात आला. यामुळे दुचाकी चालवत असताना मांजा आला तरी तो या अँगलाला अडकतो. त्यामुळे दुचाकीस्वारांचा गळा आणि डोळे सुरक्षित राहतात. वास्तविक पाहता पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरात नायलॉन मांजा कायमचा हद्दपार करणे, हे काम पोलिसांनी सहजपणे करणे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नसल्याने जीव वाचविण्यासाठी हा जुगाड वाहनधारकांसाठी आधार ठरत आहे.