बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र या प्रकरणात अद्याप मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही. मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मीक कराड याचे सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आसूडही ओढले. मात्र अद्याप वाल्मीक कराडची चौकशी झालेली नाही. हे प्रकरण आता चांगलेच तापले असून सरकारच्या कारभाराविरोधात 28 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली.
चलो बीड! संतोष देशमुख याची निर्घृण हत्या, बीडमध्ये वाढत चाललेली खुनांची मालिका आणि त्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले सरकार या निषेधार्थ 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सहभागी व्हावे !! मी जाणार आहे, तुम्ही पण या, असे आव्हाड म्हणाले.
कदाचित, मोर्चाला घाबरून सरकार वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करेल. पण, अजूनही वाल्मीक कराडला खुनाचा आरोपी केलेला नाही. हे सरकार किती निर्ढावलेले आहे ते बघा. उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की, संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे. मागील दोन वर्षात झालेल्या हत्यांच्या मागे कोण आहे? असे असूनही सरकार शांत झोपलेय. सरकारला खडबडून जाग आणण्यासाठी चलो बीड, असे आवाहन आव्हाड यांनी केले आहे.
चलो बीड ! दिनांक २८ डिसेंबर!! सकाळी ११.०० वाजता
संतोष देशमुख याची निर्घृण हत्या, बीडमध्ये वाढत चाललेली खुनांची मालिका आणि त्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले सरकार या निषेधार्थ भव्य मोर्चा ! महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सहभागी व्हावे !! मी जाणार आहे,…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 25, 2024