कृषिसेवक पदाच्या नोकरभरतीत माजी सैनिकांसाठी राज्यभरात राखीव असलेल्या 265 जागांसाठी सुमारे 157 अर्ज दाखल झालेले असताना कृषी विभागाने केवळ 47 माजी सैनिकांनी अर्ज दाखल केल्याची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती ‘मॅट’ मध्ये सादर केली. माजी सैनिकांचे कमी अर्ज आल्याचे दाखवून रिक्त राहणाऱ्या राखीव जागा खुल्या वर्गातून भरण्याचे षडयंत्र कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रचले असून, नोकरभरतीबाबत चुकीची माहिती देऊन मॅट न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी मॅटमधील अर्जदार उमेदवारांनी केली आहे.
या संदर्भात माजी सैनिक पोपट दहिफळे, हरिश्चंद्र नागरे यांच्यासह नऊ उमेदवारांनी मॅट न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये दिलेली माहिती आणि माहिती अधिकारातून मिळालेली माहिती यात मोठी तफावत असून, या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी मॅटची दिशाभूल केल्याचा आरोप पोपट दहिफळे यांनी केला आहे.
राज्य सरकारच्या कृषी विभागाने ऑगस्ट 2023 मध्ये राज्यभरातील सर्व विभागवार कृषिसेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार माजी सैनिकांसाठी 265 जागा राखीव होत्या. या राखीव जागांसाठी राज्यभरातून 150 ते 157 माजी सैनिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 20 उमेदवार लेखी परीक्षेत पास होऊन त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. परंतु या परीक्षेत खुल्या वर्गातील उमेदवारांना उत्तीर्णसाठी जी गुणमर्यादा ठेवण्यात आली, तीच गुणमर्यादा माजी सैनिकांच्या राखीव जागांसाठी ठेवण्यात आल्याने अनेक माजी सैनिक मेरीट लिस्टमध्ये आले नाहीत. त्यामुळे नऊ उमेदवारांनी मॅटकडे धाव घेतली. या प्रकरणात प्रतिवादी असलेल्या कृषी विभागाचे अधिकारी यांनी मॅटमध्ये शपथपत्र दाखल करत खोटी माहिती सादर केली. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार 265 जागांसाठी 157 उमेदवारी अर्ज आले असताना न्यायालयात माहिती देताना संबंधित अधिकाऱ्याने केवळ 47 उमेदवारी अर्ज आल्याची माहिती सादर करत माजी सैनिकांसह न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे.
माजी सैनिकांच्या आरक्षित जागा खुल्या वर्गातून भरण्याच्या उद्देशाने त्या रिक्त ठेवण्याचा घाट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घातला आहे. आर्थिक आणि वैयक्तिक लाभासाठी राखीव जागा खुल्या वर्गातून भरण्याचे षडयंत्र अधिकाऱ्यांनी रचले आहे. सर्व आठ विभागांतून निवड झालेले 20 आणि आलेले 137 अर्ज असे एकूण 157 अर्ज दाखल झालेले असतात.
संबंधितावर गुन्हा दाखल करा
■ कृषी विभागाचे सचिव, आयुक्त, पुणे सहसंचालक यांनी ‘मॅट’ प्राधिकरणासमोर जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन 10 डिसेंबरचे मॅटचे आदेश बदलून घेतले. या गंभीर प्रकाराबाबत मॅटने संबंधितावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी; अन्यथा नाईलाजास्तव दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही करावी लागेल, असा इशारा मॅटमध्ये अर्ज करणारे माजी सैनिक उमेदवार पोपट दहिफळे, हरिश्चंद्र नागरी, पितांबर घाडगे, सचिन पारखे, सुनील घोलप, नीलेश भुजबळ, कुमार मुंढे, गुरव मिष्मा, चंद्रकांत साखे आदींनी दिला आहे.