आधी मंत्रीपदासाठी आणि नंतर बंगले आणि दालनासाठी सत्ताधाऱ्यांची चढाओढ सुरू असताना महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. लाडक्या बहिणींच्या जीवावर सत्तेत आलेले भाजप सरकार आया-बहिणींना सुरक्षा देण्यात मात्र सपशेल अपयशी ठरल्याचे ढळढळीत वास्तव कल्याणमध्ये समोर आले आहे. एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आली आहे. मुलीचा मृतदेह भिवंडीच्या कब्रस्तानजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
हत्या झालेली मुलगी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एका शाळेत शिकत होती. सोमवारी संध्याकाळी चारपासून ती बेपत्ता होती. याबाबत पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. या अपहरण झालेल्या मुलीचा शोध स्थानिक कल्याण पोलीस घेत असतानाच मंगळवारी सकाळी या मुलीचा मृतदेह बापगाव येथील कब्रस्ताननजीकच्या निर्जन स्थळी आढळून आल्याने खळबळ उडाली.
मुलीवर अतिप्रसंग करून तिची निघृण हत्या झाल्याची माहिती वाऱ्यासारखी कल्याण, भिवंडीत पसरल्यानंतर संतापाची लाट पसरून तणाव निर्माण झाला, संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके मागावर असल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली. तर मुलीचा मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मुलीवर अत्याचार झाला की नाही हे स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचा मोर्चाचा इशारा
विधानसभा निवडणुकीनंतर कल्याण पूर्वमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात पोलीस कमी पडत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोर्चा काढावा लागेल, असा इशारा माजी महापौर रमेश जाधव, शहरप्रमुख शरद पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नारायण पाटील, शांताराम डिगे, आसिफ शेख, राम पावसे, कांचन दुमणे यांनी दिला आहे.
खाऊ आणण्यासाठी गेली ती परतलीच नाही
कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एका चाळीत हत्या झालेल्या मुलीचे कुटुंब राहते. सोमवारी संध्याकाळी ४ वाजता आईकडून 20 रुपये घेऊन मुलगी खाऊ आणण्यासाठी गेली होती. ती रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. लेकीचे कुणी अपहरण केले असेल तर साहेब सीसीटीव्ही फुटेज तपासून तातडीने शोध घ्या, असा टाहो आईने पोलिसांसमोर फोडला. मात्र गरीब कुटुंबाला दाद मिळाली नाही.
आरोपी मोकाट कसा?
हत्या झालेल्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एक वर्षापूर्वी 32 वर्षीय नराधमाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सतत धमकावत होता. त्यामुळे त्याच आरोपीने मुलीचे अपहरण केल्याची भीती कुटुंबीयांनी पोलिसांकडे व्यक्त केली होती. पोलिसांनी जर तत्परता दाखवून आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या असत्या तर मुलीचा जीव वाचला असता, असे म्हणत नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त केला.