पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, 15 ठार

bomb-air-strike

24 डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका भागातील बर्मल जिल्ह्याला लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 15 लोक ठार झाले. खामा प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये या घटनेनं प्रचंड गोंधळ उडाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भिती अफगाणिस्तानच्या वृत्तपत्रांतून व्यक्त करण्यात येत आहे.

या हल्ल्यामुळे लमणसह सात गावांना जबर फटका बसला, जिथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या वृत्तानुसार, पाकिस्तानी जेटद्वारे मुर्ग बाजार गावावर मोठ्याप्रमाणात बॉम्ब हल्ला करण्यात आला.

‘आमच्या भूमीचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे’, तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने हवाई हल्ल्याचा निषेध करत याचा बदला घेणार असल्याचं म्हटलं आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, बळींमध्ये ‘वझिरीस्तानी निर्वासित’ होते.

अधिकृत मृतांची आकडेवारी अद्याप उघड करण्यात आलेली नाही, परंतु किमान 15 मृतदेह सापडल्याचे स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषत: तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या अफगाण हद्दीत दहशतवाद्यांची तळं आहेत. पाकिस्तानने वारंवार अफगाण तालिबानवर टीटीपी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे. अलीकडेच पाकिस्तानी सैन्यावर हल्ले वाढवले ​​आहेत. ते हल्ले टीटीपीकडून झाल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हे हवाई हल्ले केल्याचे समजते आहे. दरम्यान, अफगाण तालिबानने पाकिस्तानकडून करण्यात आलेले हे आरोप फेटाळून लावले. तसेच 24 डिसेंबरच्या रात्री झालेल्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना नाही तर नागरिकांना लक्ष्य केले गेल्याचे म्हटले आहे.