सोलापूर शहरातील विमानसेवा तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या वतीने आज आंदोलन करून राज्यातील महायुती शासनाचा निषेध करण्यात आला. केंद्र आणि राज्य शासन यांच्या दिरंगाईमुळे सोलापुरात विमानसेवा सुरू होण्यास उशीर होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने फसवे आश्वासन दिले. त्यामुळे विमानसेवा तत्काळ सुरू व्हावी, यासाठी आगामी काळात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली.
सोलापूर शहरातील विमानसेवा सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा, असे सांगून चालू होत नव्हती. चिमणी पाडून वर्ष होऊन गेले; परंतु या ना त्या कारणाने सोलापूरची विमानसेवा रखडलेलीच आहे. विधानसभेच्या तोंडावर 23 डिसेंबरला विमानसेवा सुरू होणार, 10 डिसेंबरपासून बुकिंग होणार, अशा घोषणा भाजपकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात काहीही घडले नाही. सोलापूरच्या औद्योगिक वैद्यकीय व शैक्षणिक विश्वाच्या दृष्टीने विमानसेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे विविध उद्योगपतींना सोलापूरशी संपर्क साधणे सोपे होईल. परंतु पंतप्रधान मोदींनी ज्या विमानतळाचे लोकार्पण केले, त्यावरून विमान उडत नाही. याचा दोष कोणाला द्यायचा? पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केले की गंगार्पण, असा प्रश्न लोकांसमोर पडलेला आहे. यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश धाराशिवकर, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपरोधिक आंदोलन करून कागदी विमाने विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उडवली. तसेच फुग्याला कागदी विमान बांधून तो फुगा पंतप्रधानांकडे पाठवून दिला.
पंतप्रधान विश्वगुरू असल्यामुळे शिवसेनेने पाठवलेला संदेश त्यांना नक्कीच मिळेल. ज्याप्रमाणे नल-दमयंतीचा संदेश मेघ नेऊन देत असे; तसेच हा फुगादेखील पंतप्रधानांना सोलापूरकरांचा संदेश पोहोचवेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. या पत्राची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरची विमानसेवा सुरू करतील, असाही आशावाद व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी विधानसभाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपशहरप्रमुख लहू गायकवाड, सुरेश जगताप, संदीप बेळमकर, दत्ता खलाटे, जींस मुल्ला, रेवन बुक्कानुरे, उज्वल दीक्षित, शशिकांत बिराजदार, अजय खांडेकर, शिवा ढोकळे, गणेश कुलकर्णी, मनोज कामेगावकर, प्रकाश काशीद व कार्यकर्ते उपस्थित होते.