करमाळ्यात भीमा आणि सीना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी होत होती. या संदर्भात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वांगी नं. 1, वांगी नं. 3 येथे धाडी टाकून 72 ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. जप्त केलेला वाळूसाठा तहसील कार्यालय परिसरात आणला आहे. दरम्यान, वाळूतस्करीसंदर्भात दैनिक ‘सामना’मध्ये ‘करमाळ्यात वाळूमाफियांना कुणाचा आशीर्वाद?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर तहसीलदारांच्या पथकाने छापा टाकल्याची चर्चा सुरू होती.
महसूल पथक येणार असल्याची खबर मिळाल्याने वाळूमाफिया वाहने घेऊन पसार झाले होते. तसेच कालच उजनी पात्रातील करमाळा हद्दीतील बोटी इंदापूर, भिगवण परिसरात पाठवल्या होत्या. वांगी नं. 1 येथे संपादित क्षेत्रात साठवलेला तसेच वांगी नं. 3 देवस्थान ट्रस्टच्या हद्दीत साठवलेला अवैध वाळूसाठा जप्त केला आहे. महसूल केलेल्या धाडसत्राने वाळूमाफिया थंडावले असले, तरी पुन्हा डोके वर काढू नयेत, यासाठी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे, असा सूर जनतेतून उमटत आहे.
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या नेतृत्वाखालील कारवाई पथकात तलाठी चंदू नावडे, समाधान पाटील यांचा समावेश होता.
|| धाड की कारवाईचा सोपस्कार?
■ काल महसूल पथकाकडून धाड टाकून वाळूसाठा जप्त केला असला, तरी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही तसेच बोट किंवा वाहनावर गुन्हा दाखल झाला नाही. संपादित क्षेत्र व ट्रस्टच्या हद्दीत वाळूसाठा असल्याने कोणावर कारवाई झाली नाही. त्यामुळे ही कारवाई फक्त सोपस्कार पार पाडण्यासाठी होती का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
वाळूसाठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही धाड टाकली होती. मात्र, संपादित क्षेत्र व ट्रस्टच्या हद्दीत वाळूसाठा असल्याने आम्हाला तत्काळ गुन्हा दाखल करता आला नाही. चौकशी करून पुढील कारवाई करू तसेच कुठेही वाळूचोरी होत असल्यास कठोर कारवाई केली जाईल. – शिल्पा ठोकडे, तहसीलदार करमाळा.