चुकीच्या वृत्तांमुळे राहुरी कृषी विद्यापीठाची बदनामी, कर्मचाऱ्यांकडून निषेध; कुलसचिवांना दिले निवेदन

कृषी विद्यापीठातील काही विघ्नसंतोषी लोकांकडून पुरविल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या आधारे कुलगुरू, कुलसचिव व उपकुलसचिवांबाबत काही प्रसारमाध्यमांत जाणीवपूर्वक बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध होत आहे. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या या वृत्तामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अधिकाऱ्यांची होत असलेल्या बदनामीच्या विरोधात कर्मचारी समन्वय संघ, मागासवर्गीय कल्याणकारी संघ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कुलसचिवांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, माजी कुलसचिव डॉ. एम. जी. शिंदे आणि उपकुलसचिव (प्रशासन) व्ही. टी. पाटील यांनी आचारसंहिता भंग केल्याची चुकीची माहिती काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळे कृषी विद्यापीठ व अधिकाऱ्यांची बदनामी झाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने आचारसंहितेच्या काळात बदलीचे आदेश काढणे, कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लाभ देण्याचे परिपत्रक जारी करणे, पदोन्नतीचे आदेश काढणे, हे आरोप केले होते. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे खुलासा मागितला होता.

या अनुषंगाने कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, माजी कुलसचिव डॉ. एम. जी. शिंदे आणि उपकुलसचिव (प्रशासन) व्ही. टी. पाटील यांनी स्वतंत्र खुलासे सादर केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी, राहुरी यांनी सदर प्रकरणाची तपासणी केली व आचारसंहिता भंग न झाल्याचा अहवाल दिला.

अहवाल येऊनही चुकीची वृत्तं प्रसारित करण्यात आली. या बदनामीकारक वृत्तांमुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. अशा विघ्नसंतोषी घटकांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ, राहुरी, मागासवर्गीय कल्याणकारी संघ, मफुकृवि, राहुरी आणि कंत्राटी कर्मचारी जाहीर निषेध करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

कुलगुरू डॉ. पाटील यांच्या कामामुळे कृषी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय मिळत असून, विद्यापीठाचा नावलौकीक होत आहे व कोणावरही अन्याय झाल्याच्या भावना कर्मचाऱ्यांमध्ये नाहीत. मात्र, कुलगुरू, कुलसचिव आणि उपकुलसचिवांची बदनामी होत असल्याचा महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ, मागासवर्गीय कल्याणकारी संघ, मफुकृवि, आणि कंत्राटी कर्मचारी या बाबींचा तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.