बनावट सोने तारण ठेवून गोरेश्वर पतसंस्थेची ४६ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोल्ड व्हॅल्युअर शैलेंद्र चंद्रकांत डहाळे व १० कर्जदारांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब संपत कोल्हे (रा. पारनेर) यास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी बनावट सोने प्रकरण उघडकीस आले असतानाही संस्था प्रशासनाने विलंबाने गुन्हा दाखल केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
आशा बाळासाहेब कोल्हे, भारती अनिल दैवज्ञ, अंबादास दिलीप औटी, राजेंद्र अर्जुन काणे, शंकर पोपट औटी, दिलीप निवृत्ती खोसे, सुजाता शैलेंद्र डहाळे (सर्व रा. पारनेर), राहुल बाळासाहेब कावरे (रा. सिद्धेश्वरवाडी, पारनेर), पोपट इंद्रभान सोंडकर (रा. लोणी हवेली, पारनेर) अशी इतर आरोपींची नावे आहेत.
गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या गोरेगाव शाखेतून १२ जून २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत १० कर्जदारांनी बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची फेड केली नाही. कर्जदारांना वारंवार नोटिसा पाठवूनही दखल घेतली जात नव्हती. गोल्ड व्हॅल्युअर शैलेश डहाळे याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या पारनेर शाखेतही अशाच प्रकारे बनावट सोने खरे असल्याचे भासवून कर्ज देण्याची शिफारस केली होती. बँकेकडून कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर गोरेश्वर पतसंस्था प्रशासनास शंका आल्याने त्यांच्याकडे ठेवण्यात आलेल्या सोन्याची पडताळणी करण्यासाठी गोल्ड व्हॅल्युअर शैलेंद्र डहाळे व कर्जदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या. मात्र, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली होती. वारंवार नोटिसा पाठवूनही दखल न घेतल्याने अखेर संस्थेच्या वतीने गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शाखा व्यवस्थापक जालिंदर जनाजी नरसाळे (रा. गोरेगाव, पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचीही फसवणूक
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पारनेर शाखेत दोन वर्षांपूर्वी गोल्ड व्हॅल्युअर शैलेंद्र डहाळे याने अशाच पद्धतीने बनावट सोने खरे असल्याचे भासवून सोने तारण कर्ज देण्याची शिफारस केल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी गोरेश्वर पतसंस्थेसाठी गोल्ड व्हॅल्युअर म्हणून काम पाहणाऱ्या डहाळे याने तेथेही फसवणूक केल्याचे समोर आले होते. मात्र, संस्थेच्या व्यवस्थापनाने दोन वर्षे विलंबाने गुन्हा दाखल केला. सध्या संस्थेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे.