Success story – पालावर वाढलेला अमोल झाला पोलीस अधिकारी; नंदीबैलासोबत भटकंती करत मिळवले यश

भटकंती करत पालावर संसार थाटणाऱ्या कुटुंबातील अमोल चिमाजी गोंडे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक या पदावर विराजमान झाला आहे. ईश्वरपूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणाची अक्षरे गिरवणारा अमोल हिंदू-मेढंगी जोशी नंदीबैलवाले समाजातील पहिलाच अधिकारी झाला आहे.

ईश्वरपुरातील ख्रिश्चन बंगल्याच्या रिकाम्या मैदानावर 1999 साली नंदीबैलासोबत भटकंती करत गोंडे कुटुंबातील पाल आली होती. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शकुंतला पाटील या शिक्षिकेच्या पुढाकाराने तो शिक्षणाच्या प्रवाहात आला होता. झोपडपट्ट्या उठल्यावर सगळी कुटुंबे साताऱ्याला गेली. चौथीला स्कॉलरशिपमध्ये येणारा अमोल व त्याचा चुलत भाऊ दिवाणजी या दोघांचा स्वतःच्या घरी सांभाळ केला. त्यावेळी शिक्षिका असणाऱ्या सरोजनी मोहिते यांचेही सहकार्य मिळाले.

रिकाम्या मैदानावर नंदीबैल घेऊन आलेल्या झोपड्यांत दिसणारी लहान लहान मुले पाहून शकुंतला पाटील यांनी या शाळाबाह्य मुलांची नोंदणी केली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणले. अडाणी असणाऱ्या समाजाला समजावणे खूप अवघड काम होते. दररोज सकाळी नंदीबैलावर बसून भविष्य सांगत हिंडणाऱ्या बापाबरोबर मुलं जायची. त्यांना त्यापासून रोखले आणि जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक दोनच्या शिवनगर भाग शाळेत आणले. तिथे प्राथमिक शिक्षणाचे बाळकडू दिले.

त्यानंतर बारामतीमधील मेडद या मूळ गावी सहावी व सातवीपर्यंतचे शिक्षण केले, तर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण नंदीबैलाबरोबर भटकंती करत वेगवेगळ्या गावांमध्ये पूर्ण केले. बारामती येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अमोलचे वयाच्या २१व्या वर्षीच लग्न झाले. त्यानंतर दोन मुले झाली. मुलगी अमिता आणि मुलगा आरुष जिल्हा परिषद शाळेत शिकतात. अमोलच्या कुटुंबात एकूण २२ सदस्य आहेत. आई-वडील, चार भाऊ, भावांची मुले आणि इतर सर्वजण राहतात. वडील व सर्व भाऊ नंदीबैल घेऊन दारोदारी भिक्षा मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याची आई, पत्नी नम्रता आणि वहिनी हातावर गोधड्या शिवतात.

अमोलने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. 2014 साली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 2015 ला एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात पीएसआयची पूर्व व मुख्य परीक्षा तो उत्तीर्ण झाला. फिजिकल परीक्षेत यश मिळाले; पण अंतिम यादीत नाव आले नाही. त्यानंतर 2017 ते 2019 दरम्यान तीन पीएसआयच्या मुख्य परीक्षेत यश मिळवले; पण मुलाखतीसाठी निवड झाली नाही. जुलै 2023 च्या अंतिम यादीत निवड झाली. विविध पदांसाठीच्या एकूण 13 मुख्य परीक्षा दिल्या होत्या; मात्र निवड झाली नव्हती. स्वयं अध्ययनाच्या जोरावर संसार करत यश मिळवले. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या पदवीदान समारंभात त्याने पोलीस उपनिरीक्षक पदाची रैंक घेतली, आता तो नागपूर येथे पोलीस दलात रुजू होणार आहे.

मला शाळेचे दार उघडून देणाऱ्या माझ्या शिक्षिका शकुंतला पाटील आज हयात नाहीत. त्यांची आज आठवण होतेय. त्यांच्या कचरे गल्लीतील घरी केलेले वास्तव्य आणि घरातील सर्वांकडून मिळालेले बाळकडू मला प्रेरणा देणारे ठरले. शाळेतील बाईंच्या घरी राहिलो. त्यांचा मुलगा कर्नल रणजित पाटील यांची त्यावेळी लष्करात निवड झाली होती. त्याच वेळी मला शिकून मोठं व्हायची प्रेरणा व संस्कार मिळाले. बाईंच्या घरातील सर्वांकडून मला शिकण्याची ऊर्मी मिळाली आणि त्याच्या जोरावरच मी माझे भवितव्य घडवले. माझे यश पाहण्यासाठी माझ्या बाई हव्या होत्या. मी माझ्या नोकरीत प्रामाणिकपणे सेवा करून आदर्शवत काम करणार आहे.

अमोल गोंडे, पोलीस उपनिरीक्षक

मी व माझ्या सुना गोधड्या शिवतो. घरची परिस्थिती हलाखीची असताना परिस्थितीवर मात करून अमोलने शिक्षण घेतले. आता तो साहेब होऊन समाजाचे नाव कमवेल. आता आमची भटकंती थांबेल. सुखाचा घास खायला मिळेल.

मालन गोंडे, अमोलची आई

माझा पोरगा साहेब झालाय, यावर विश्वास बसत नाही. आमच्यासारख्या गरिबाचा मुलगा साहेब होऊ शकतो, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. आम्ही दारोदारी जाऊन लोकांना राम राम घालतो. नमस्कार करतो. माझ्या मुलाला लोक सॅल्युट घालतील, याचा अभिमान वाटतो. मुलामुळे आमचा समाज थोडाफार शिक्षणाकडे वळेल.

चिमाजी गोंडे, वडील