शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीला बिबट्याने आईसमोरच फरफटत नेले. दोन तासांनंतर चिमुरडीचा मृतदेह लचके तोडलेल्या अवस्थेत सापडला. आज सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेने ग्रामस्थ सुन्न झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील पूर्व भागात तिसऱ्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
मुलीचा मृतदेह पाहताच मुलीचे आई-वडील व नातेवाईकांनी टाहो फोडला. बिबट्याने चिमुरडीचे धड व डोके वेगळे केले असून, यामुळे नागरिकांना मांडवगण फराटा येथे 15 नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शिवतेज टेंभेकर या पाच वर्षीय मुलाची आठवण झाली.
रक्षा अजय निकम (वय – 4, रा. पिंपळसुटी, ता. शिरूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली. यावेळी या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे झालेल्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलीवर हल्ला केला.
शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथील नदीकिनारी दशक्रिया घाटाजवळ निकम कुटुंबीय राहतात. त्यांची चार वर्षीय मुलगी रक्षा अंगणात खेळत होती, तर आई दुसऱ्या मुलाला जेऊ घालत होती. त्यावेळी अचानक आईसमोरच बिबट्याने रक्षावर झडप घालून तिला शेतामध्ये फरफटत नेले. आईने मागे जाण्याचा प्रयत्न केला; परंतु अंधारात बिबट्या मुलीला घेऊन दूर शेतात गेला. आईने आरडाओरडा केल्याने नागरिक जमा झाले. नागरिकांबरोबरच वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मुलीचा शोध सुरू केला. जवळपास दोन ते अडीच तासांनी तिचा मृतदेह सापडला.
शिरूर तालुक्यातील पूर्व भागात याअगोदर मांडवगण फराटा येथे दोन मुलांना बिबट्याने हल्ला करून ठार मारले. त्यानंतर पूर्व भागात आज घडलेली ही तिसरी घटना आहे. मांडवगण फराटा येथे दोन मुलांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यानेच हा हल्ला केला तर नाही ना? अशी शंका वन विभागाला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी याअगोदर मांडवगण, तसेच वडगाव रासाई परिसरात वन विभागाने 20 पिंजरे लावले होते. त्यात मांडवगण व वडगाव रासाई परिसरात दोन, तर रांजणगाव सांडस परिसरात दोन बिबटे जेरबंद झाले होते.
परिसरात पिंजरे लावण्याची मागणी
मांडवगण फराटा परिसरात बिबट्याचा वावर असून, दोन पशुधनाचा बळी त्यांनी घेतला आहे. पूर्व भागात बिबट्यांची संख्या मोठी असून, मांडवगण फराटानंतर जवळच असलेल्या पिंपळसुटी गावात नरभक्षक बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी तत्काळ वन विभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शशिकांत वेताळ यांनी केली आहे.