वरळीतील महात्मा फुलेनगरमधील महिलांचे स्वच्छतागृहासाठी आंदोलन, अपुऱ्या सुविधांमुळे रहिवाशांची गैरसोय

वरळीतील महात्मा फुले नगरमधील झोपडपट्टीमध्ये लोकवस्तीच्या प्रमाणात शौचालयांची पुरेशी व्यवस्था नसल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी तातडीने सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करावी यासाठी वरळीतील महिलांनी या ठिकाणी आंदोलन केले. एकीकडे मोठमोठय़ा प्रकल्पांसाठी कोटय़वधी रुपये पालिका खर्च करीत असताना रहिवाशांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे सांगत महिलांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला.

वरळीतील महात्मा फुले नगर झोपडपट्टी ही कोस्टल रोडला लागूनच आहे. या ठिकाणी सुमारे बाराशे कुटुंबे राहतात. या ठिकाणच्या शौचालयाची दुरुस्ती करण्यासाठी काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले. मात्र हे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्याने रहिवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप महिलांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी पालिकेने तात्पुरते फिरते शौचालय दिले आहे, मात्र या शौचालयांमध्ये स्वच्छता राखली जात नाही. शिवाय पाण्याची पुरेशी उपलब्धता नसल्याचा आरोपही महिलांकडून करण्यात येत आहे. शिवाय अस्वच्छतेमुळे या परिसरात रोगराई पसरण्याचा धोका आहे. यामुळे रहिवाशांमध्ये पालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने महिलांनी नुकतेच या ठिकाणी आंदोलन करून पालिकेचा निषेध केला.

…तर वॉर्ड ऑफिसला टाळे

महात्मा फुले झोपडपट्टीमधील गैरसोयींबाबत गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेच्या जी/दक्षिण वॉर्ड ऑफिसकडे पाठपुरावा सुरू आहे, मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी जी/दक्षिण वॉर्ड ऑफिसवर धडक दिली. यावेळी पुढील दहा दिवसांत या ठिकाणची गैरसोय दूर करून रहिवाशांना शौचालयाची सुविधा दिली नाही तर वॉर्ड ऑफिसला टाळे ठोकण्याचा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

पालिका म्हणते

या ठिकाणच्या शौचालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर दुरुस्ती आवश्यक असल्याने निदर्शनास आल्याने वॉर्डकडून या सहा आसनी शौचालयाची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. याला पर्याय म्हणून दहा आसनी तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता करून देण्यात आली असल्याची माहिती जी/दक्षिणच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी दिली.