श्याम बेनेगल अनंतात विलीन, दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ यांसारख्या समांतर सिनेमांची निर्मिती करून रसिक प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान निर्माण करणारे सर्जनशील दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर मुंबईत अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. अंत्यसंस्कारापूर्वी बेनेगल यांचे पार्थिव दादरच्या शिवाजी पार्क येथील भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी येथे सुमारे तासभर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी तिरंग्यामध्ये लपेटलेला त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सन्मानाने नेला. मुंबई पोलिसांच्या बँड पथकाद्वारे यावेळी शोकधून वाजवण्यात आली. बंदुकीच्या तीन फैरी झाडून बेनेगल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह, सचिन खेडेकर, गीतकार गुलजार, इला अरुण, प्रल्हाद कक्कड, बोमन इराणी, हंसल मेहता, रत्ना पाठक शाह, दिव्या दत्ता, रणजित कपूर, विवान शहा, कुणाल कपूर, नंदिता दास, श्रेयस तळपदे, कुलभूषण खरबंदा कलाकार अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थित होते.