मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपातील रस्सीखेच आणि शासकीय निवासस्थानाच्या वाटपातील कुरघोडीनंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये वाद सुरू होणार असल्याचे पाहायला मिळाले आहे. रायगड जिह्याच्या पालकमंत्री पदावरून मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यात वाद सुरू होणार आहे. कारण या दोन्ही मंत्र्यांच्या समर्थकांनी रायगड जिह्यातील महामार्गावर भावी पालकमंत्री असा उल्लेख करणारे बॅनर झळकवले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात आदिती तटकरे यांना महिला व बाल विकास तर भरत गोगावले यांना रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभाग मिळाले आहे. पण रायगड जिह्याच्या पालकमंत्री पदावरून या दोन मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे. कारण मंत्रीपद मिळाल्यावर भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावर जाहीर भाष्य केले होते. आम्हाला पालकमंत्री पद पाहिजे आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर 100 टक्के दावा आमचा असल्याचे भरत गोगोवले यांनी जाहीरपणे सांगितले आहे. पण अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांनीही रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या समर्थकांनी रायगड जिह्यात मुंबई- गोवा महामार्गावर भावी पालकमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर सर्वत्र झळकवले आहेत. ठाणे जिह्याच्या पालकमंत्री पदावरूनही वाद होण्याची चिन्हे आहेत.
दादा, तुम्ही बीडचे पालकमंत्री व्हा
बीडचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण मागील सरकारच्या काळात धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते, पण बीडमधील आताच्या घटनेनंतर धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. त्यांना अन्न व नागरी पुरवठा विभाग मिळाला आहे. पण बीडचे पालकमंत्री पद त्यांना मिळू नये अशी अनेक आमदारांची इच्छा आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुम्ही बीडचे पालकमंत्री व्हा अशी गळ घातली आहे. दरम्यान, महायुतीचे आम्ही तीन नेते मिळून बीडचे पालकमंत्री कोण हे ठरवू. पण बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.