शीव पुलाच्या कामामुळे बेस्ट मार्गात बदल 

शीव उड्डाणपुलाच्या कामामुळे बेस्टने अनेक बस मार्गांमध्ये बदल केले आहेत. यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे आधीच गाडय़ा कमी झाल्या असताना बसमार्ग बदलल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत असून बेस्टचा महसूलही घटत आहे.

मध्य रेल्वेच्या शीव स्थानकावरील उड्डाणपुलाचे काम चालू असल्यामुळे बस मार्ग ए 25, 176, 305, 312, ए 341, 463 हे बसमार्ग वळवण्यात आले आहेत. या मार्गावरील बसगाडय़ा अप दिशेमध्ये अशोक मिल नाका येथे डावे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने पिवळा बंगला सिग्नल येथे उजवे वळण घेऊन धारावी आगार, नाईक नगर येथे डावे वळण घेऊन आपल्या नियोजित मार्गाने पुढे जातील, असा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. हा बसमार्ग डाउन दिशेमध्ये नाईक नगर येथे उजवे वळण घेऊन पिवळा बंगला सिग्नल येथे डावे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने पुढे जाऊन अशोक मिल नाका येथे उजवे वळण घेऊन 90 फूट मार्गे व पुढे आपल्या नियोजित मार्गाने जातील. तसेच बसमार्ग 11 जादा व 374 च्या बसगाडय़ा शीव येथे खंडित करून तेथेच यू टर्न घेऊन धारावी आगार मार्गे पिवळा बंगला व पुढे आपल्या नियोजित मार्गाने जातील.