बाल रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया, फिरत्या दवाखान्याचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण; शिवसेना दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा उपक्रम

गरजू बाल रुग्णांसाठी विशेष मोफत शस्त्रक्रिया उपक्रमा अंतर्गत फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ‘मातोश्री’ येथे करण्यात आले. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, विभागीय पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना दक्षिण मध्य मुंबई लोकसभेच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे.

गरजू बाल रुग्णांसाठी विशेष मोफत शस्त्रक्रिया उपक्रमा अंतर्गत 12 मल्टिस्पेशालिस्ट दवाखाने, बाल हृदयरोग, मोतीबिंदू, दुभंगलेले ओठ-टाळू यांच्यावर दरमहा 100 मोफत शस्त्रक्रिया पार पडणार आहेत. त्याचबरोबर 15 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत संपूर्ण दक्षिण मध्य मुंबई क्षेत्रात पार पडणाऱ्या सांस्कृतिक, कला व क्रीडा महोत्सवाची घोषणादेखील या वेळी करण्यात आली. या महोत्सवात क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, बॅडमिंटन, पॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कुस्ती, कबड्डी, अभिवाचन, पथनाटय़, कवी संमेलन, एकांकिका, साहित्य संमेलन, वत्तृत्व, निबंध, चित्रकला, होम मिनिस्टर, मिनी मॅरेथॉन, महिलांसाठी टर्फ क्रिकेट, पंजा, रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे.