पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्रमंडळींना घरात ठेवणे ही पत्नीने पतीच्या बाबतीत केलेली क्रूरता आहे, असा निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. पत्नी माहेरच्या लोकांना आपल्या घरात वारंवार मुक्कामी ठेवत असल्याने आपला मानसिक छळ होत आहे, असा दावा करीत पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा दावा ग्राह्य धरला आणि क्रूरतेच्या आधारे पत्नीपासून घटस्फोट घेण्यास मंजुरी दिली.
पत्नीच्या माहेरचे लोक घरात तळ ठोकून राहतात. त्यामुळे त्रस्त झालेल्या पतीने आधी कनिष्ठ न्यायालयात घटस्फोटासाठी दाद मागितली होती. मात्र कनिष्ठ न्यायालयाने क्रूरता घडल्याचा दावा अमान्य करीत घटस्फोटाचा अर्ज फेटाळला होता. तो निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती उदय कुमार यांच्या खंडपीठाने रद्द केला. याचिकाकर्ता पतीच्या शासकीय निवासस्थानी पत्नीच्या माहेरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दीर्घकाळ येऊन राहायचे. त्यांच्या मुक्कामावर पतीने आक्षेप घेतला होता. त्यानंतरही पत्नीने माहेरचे लोक आणि मित्रमंडळींचा मुक्काम रोखला नव्हता. हा सर्व प्रकार पतीच्या बाबतीत क्रूरताच आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना नोंदवले.
नेमके प्रकरण काय?
घटस्फोट मिळालेल्या दाम्पत्याचे 2008 मध्ये नबद्वीप येथे लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे कोलाघाट येथे राहण्यास गेले. काही दिवसांनी पत्नीचे कार्यालय नरकेलडांगा येथे शिफ्ट झाले आणि ती तिथे राहण्यास गेली. मात्र तिच्या माहेरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी पतीच्याच शासकीय निवासस्थानी मुक्कामाला यायचे. पतीला ही बाब खटकली होती.