छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात व्हावे ही शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जलपूजन करूनही स्मारकाचे कामच सुरू झाले नाही. त्याचा निषेध करून सरकारला जागे करण्यासाठी मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवप्रेमी मंगळवारी सकाळी दहा वाजता मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर धडकले. जलपूजनाला परवानगी न देणाऱ्या पोलिसांना गुंगारा देत अरबी समुद्रात जलपूजन दिन साजरा केला आणि सरकारचा नाकर्तेपणाच उघडा पाडला आहे.
शिवप्रेमींना अटक
गिरगाव चौपाटीवर परवानगी नाकारल्यानंतर आंदोलकांनी गेटवे ऑफ इंडिया येथे जलपूजनाचा निर्णय घेतला. मात्र तेथेही पोलिसांनी मज्जाव करून आंदोलकांना अटक केली आणि आझाद मैदानावर आणून येथे जलपूजन करा असे फर्मान सोडले. जलपूजनाला परवानगी नाकारल्यानंतरही शिवप्रेमींनी गनिमी काव्याने जलपूजन केले. यावेळी प्राध्यापक चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे पाटील, संतोष तांबे पाटील, रवींद्र नीळ, अशोक वीरकर, भारत जाधव, राजुभाऊ नलावडे, देविदास राजळे पाटील, चंद्रकांत सावंत, रोशन डूलगज, नितीन भराट उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
आठ वर्षे उलटली तरी शिव स्मारकाचे कोणतेही काम अद्याप झालेले नाही. याचा निषेध करीत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉइंटजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक शिवभक्त आंदोलकांवर पोलिसांनी धक्काबुक्की करीत पोलीस व्हॅनमध्ये काsंबले. शिवरायांच्या नावाने जलपूजनाचा दिखाऊ सोहळा करून, आठ वर्षे स्मारकाचे काम थांबवणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचाही घोर अपमान आहे. आजचे हे आंदोलन या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी होते, पण सरकारने पोलिसांच्या हाताने दडपशाही करून लोकशाहीची गळचेपी करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.