सिम स्वॅपच्या माध्यमातून ठगाने पंपनीच्या बँक खात्यातून 7.50 कोटी रुपये काढले. पोलिसांनी तात्काळ तपास करून कंपनीचे 4. 65 कोटी रुपये वाचवले. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेली रक्कम खात्यामध्ये गोठवण्यासाठी 1930 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. कांदिवली येथे खासगी कंपनी आहे.
सोमवारी कंपनीच्या मालकाचे सिम स्वॅप करून बँक खात्यातून 7.50 कोटी रुपये विविध खात्यात वळते केले. खात्यातून पैसे गेल्याचे ईमेल आल्यावर कंपनीला समजले. त्यानंतर पंपनीच्या मालकाने सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क केला. उप निरीक्षक मंगेश भोर, राऊळ, वालवलकर, किरण पाटील आदी अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्याला संपर्क करून 4 कोटी 65 लाख रुपये रक्कम वाचवली. बाकीची रक्कम ज्या खात्यात गेली आहे, त्याची माहिती पोलीस काढत आहेत.