भ्रष्टाचारामुळे न्यायालये चुकीचा निर्णय देतात! प्रशांत भूषण यांचे परखड मत

भ्रष्टाचारामुळे न्यायालये अनेक प्रकरणात चुकीचा निर्णय देतात. सर्वसामान्य लोकांना मात्र ‘तारीख पे तारीख’च्या दुष्टचक्राचा सामना करावा लागतो. न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचाराचा कलंक लागल्यामुळे सर्वसामान्यांना वेळीच न्याय मिळत नाही, असे परखड मत ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी मंगळवारी व्यक्त केले. त्यांनी एक देश एक निवडणुकीला कडाडून विरोध केला आहे. हे विधेयकच मुळात घटनाबाह्य आणि हास्यास्पद असल्याचे तसेच संसदीय लोकशाहीत अव्यवहार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

संसदीय लोकशाहीत अशाप्रकारे विविध निवडणुका एकाचवेळी घेणे अशक्य असून हे सर्व हास्यास्पद आहे, असे प्रशांत भूषण म्हणाले.

जर काही लोकांमुळे सरकार अडचणीत आले, सरकार पडले आणि दुसरे सरकार बनलेच नाही तर मग काय? अशावेळी राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. जर पेंद्रातील सरकारच पडले तर काय? तुम्ही काय करणार? अशावेळी राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकत नाही. अशावेळी पुन्हा निवडणुका घेणे हाच पर्याय उरतो. त्यामुळे एक देश एक निवडणूक हे विधेयक लोकशाहीविरोधी आहे, असे प्रशांत भूषण म्हणाले.