हिंदुस्थानचा माजी स्टायलिश फलंदाज विनोद कांबळी याची प्रकृती आता स्थिर असून त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर समोर आले आहे. रविवारी सायंकाळी बेशुद्ध पडल्याने कांबळीला तत्काळ भिवंडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस विनोद कांबळीवर उपचार करत असलेले डॉ. विवेक त्रिवेदी यांच्याकडे कांबळीने प्रथमतः मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना होत असल्याची तक्रार केली होती. मात्र परवा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या विविध तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्या तपासण्यांच्या अहवालात त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे दिसून आले आहे. सध्या कांबळीच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयाने विशेष पथक ठेवले आहे.