कोणाचाही बाप आला तरी हे मॅटर दबू देणार नाही, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही; जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन आठवडे उलटून गेले तरी तीन आरोपी आणि मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक झालेली नाही. तपास करायला सरकारला एवढे दिवस लागतात का, असा सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हाटणार नाही. कोणाचाही बाप आला तरी हे मॅटर मी दबू देणार नाही, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.

आपण उद्या (दि. 25) परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी कुटुंबाची भेट घेणार आहोत. त्यानंतर मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचीही पुन्हा भेट घेणार, अशी माहिती त्यांनी दिली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपी आणि मुख्य सूत्रधाराला अटक करावी या मागणीसाठी शनिवारी (दि. 28) बीडमध्ये जनतेने मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात आपण सहभागी होणार आहोत. जनतेनेही मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.

कोणाचाही बाप आला तरी हे मॅटर मी दबू देणार नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही. सरकारला आरोपींनी एकमेकांना केलेले पह्न तपासायला एवढे दिवस लागतात का? एकदा बीड जिह्यातील जनतेने तपास हातात घेतला, तर मग सरकारला कळेल, असा इशाराच त्यांनी दिला.