PKL 2024 – यूपी योद्धाजची बंगळुरू बुल्सवर मात

उत्कंठापूर्ण लढतीत आठव्या मिनिटाला आठ गुणांनी पिछाडीवर असलेल्या यूपी योद्धाज संघाने बंगळुरू बुल्सवर 44-30 अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीग मध्ये दिमाखदार विजय मिळविला. मध्यंतराला बंगळुरू संघ 19-18 असा आघाडीवर होता.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत यूपी योद्धाज संघाने याआधी झालेल्या 21 सामन्यांपैकी 12 सामने जिंकून यापूर्वीच ‘प्ले ऑफ’ मध्ये स्थान मिळविले आहे. ‘प्ले ऑफ’मधील अव्वल स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या दृष्टीने आजचा सामना महत्त्वाचा होता. या लीगमध्ये त्यांनी पकडी व चढाई या दोन्ही आघाडय़ांवर काwतुकास्पद कामगिरी केली आहे. ‘प्ले ऑफ’मधील सामन्यांसाठी मनोधैर्य उंचावण्याकरिता त्यांना आजचा सामन्यात विजय अपेक्षित होता.

त्यांच्या तुलनेत बंगळुरू संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. याआधी झालेल्या 21 सामन्यांपैकी केवळ दोनच सामने त्यांना जिंकता आले आहेत आणि साखळी गटात ते शेवटच्या स्थानावर आहेत. स्पर्धेची यशस्वी सांगता करण्यासाठी आजचा सामना जिंकणे हेच त्यांचे ध्येय होते. त्यादृष्टीनेच त्यांनी झकास सुरुवात केली.

आठव्या मिनिटालाच त्यांनी यूपी संघावर पहिला लोण चढविला आणि 11-3 अशी आघाडी घेतली. मात्र त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. कारण तेराव्या मिनिटाला यूपी संघाने पहिला लोण नोंदविला आणि बंगळुरू संघाची आघाडी कमी केली. त्यामुळे सामन्यातील रंगत वाढली. मध्यंतरास एक मिनिट बाकी असताना 18-18 अशी बरोबरी होती. मध्यंतराला बंगळुरू संघाकडे एक गुणाची आघाडी होती.

उत्तरार्धात दोन्ही संघांनी आघाडी घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले यूपी संघाने 25 व्या मिनिटाला तीन गुणांची आघाडी मिळवली होती. पुढच्या मिनिटाला त्यांना लोण चढवण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत त्यांनी लोण नोंदवीत सहा गुणांची आघाडी घेतली. बंगळुरू संघाच्या खेळाडूंनी ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र यूपी संघाने शेवटपर्यंत आपले वर्चस्व राखून विजयश्री खेचून आणली. शेवटच्या मिनिटालाही त्यांनी आणखी एक लोण चढविला.  यूपी संघाकडून सुरेंदर गिल याने खोलवर चढाया केल्या तर शिवम चौधरी याने उत्कृष्ट पकडी केल्या.